आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 कोटी 20 लाख गेले वाया, महिलांसाठी स्‍वच्छतागृह बांधू शकली नाही महापालिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- वेळेवर खर्च करण्यात न आल्याने महिला व बालकल्याण समितीचे गेल्या चार वर्षात एक कोटी 20 लाख रुपये वाया गेले आहेत. महापालिकेचे नियोजन नसल्याने विकासकामांना याचा फटका बसला असून यंदाही खर्च न झाल्याने निधी परत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महापालिकेच्या अर्थसंकल्पात दरवर्षी महिला व बालकल्याण समितीसाठी 40 लाखांची तरतूद करण्यात येते. या निधीतून समितीचे सभापती काम सूचवतात. त्यानंतर महापालिका प्रशासन त्याची अंमलबजावणी करते. मात्र महिला व बालकल्याण समितीने पाठपुरावा करूनही महापालिकेच्या दुर्लक्षामुळे सूचवलेली कामेच झाली नाहीत. त्यामुळे 2009 ते 2013 या कालावधीतील मंजूर निधी परत गेला आहे. यंदाही महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. पण, त्यावर अद्याप कार्यवाही न झाल्याने या वर्षीचा निधीही वाया जाण्याची शक्यता आहे.

शहरातील महिला स्वच्छतागृहाच्या समस्येवर ‘दिव्य मराठी’ने 26 ऑक्टोबर 2012 रोजी सर्वप्रथम प्रकाश टाकला होता. त्यानंतर ‘डीबी स्टार’च्या माध्यमातून ही समस्या मांडण्यात आली. या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्यानंतर प्रशासनाने याची दखल घेतली. महिला व बालकल्याण समितीच्या सभेत काही प्रभागात महिला स्वच्छतागृह उभारण्याचा ठराव करून तो महापालिकेकडे पाठवण्यात आला. पण, त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही.

कामाच्या सूचना दिल्या
शहरात महिला स्वच्छतागृह बांधण्यासंदर्भात यापूर्वी संबंधित अधिकारी आणि मक्तेदार यांची बैठक घेतली होती. जागा पाहण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. तो आढावा घेऊन लवकरात लवकर काम सुरू करण्यात येईल.’’ चंद्रकांत गुडेवार, महापालिका आयुक्त

प्रयत्न सुरू आहेत
महिला स्वच्छतागृह बांधण्याकरिता आमचा नेहमीच पाठपुरावा असतो. यंदाच्या वर्षी सूचवण्यात आलेल्या स्वच्छतागृहांसाठी प्रयत्न सुरूआहेत. निधी वाया जाणार नाही याची दक्षता घेऊ. ’’ दत्तात्रय चौगुले, अधिकारी, महिला व बाल कल्याण विभाग

..अन्यथा ठिय्या मांडणार
स्वच्छतागृहासाठी पंधरा पत्रे पाठवून पाठपुरावा केला. आयुक्तांनी संबंधितांना सूचना देऊनही अद्याप काम सुरू नाही. काही दिवसांत प्रक्रिया पूर्ण न केल्यास आयुक्तांच्या कक्षासमोर ठिय्या मांडू.’’ फिरदोस पटेल, सभापती, महिला व बाल कल्याण समिती

महापालिका कामाबाबत उदासीन
महिला स्वच्छतागृहाबाबतचे पत्र महापालिका प्रशासनाकडे दाखल झाले आहे. त्यानंतर जागेची पाहणी, टेंडर मंजुरी आदी कामे झाल्यानंतर प्रत्यक्षात काम सुरू होते. पण, ही प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत महापालिका उदासीनता दाखवते. त्यामुळे कामे रखडली जातात.

आमदाराचे आवाहनही बासनात
आमदार प्रणिती शिंदे यांना 26 ऑक्टोबर 2012 रोजी विचारले असता त्यांनी महापालिकेने जागा उपलब्ध करून दिल्यास पाहिजे तेवढा निधी मी द्यायला तयार आहे. शहरातील बाजारपेठेत महिलांकरिता स्वच्छतागृह बांधू, अशी हमी दिली होती. यानंतर आजतागायत जागा उपलब्ध करून दिली नाही.