आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Solapur Municipal Corporation Issue Congress Vs NCP

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापालिका: आघाडीची कथा, तुझे माझे जमेना; सत्तेवाचून करमेना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूरकरांनी महापालिकेच्या सत्तेची सूत्रे काँग्रेसकडे सोपवतानाच राष्ट्रवादी काँग्रेसलाही सोबत घेण्याबाबतचा कौल दिला. शनिवारी या निकालाला वर्ष पूर्ण होत आहे. वर्षभरात ‘तुझे माझे जमेना, सत्तेवाचून करमेना’ अशी स्थिती सत्ताधारी आघाडीतील दोन्ही पक्षांत दिसून आली. निवडणुका जिंकण्यासाठी दोन्ही पक्षांनी जाहीरनामे दिले. वर्षात त्यांना जाहीरनाम्याकडे लक्षच देता आले नाही असे दिसते.

आघाडीत एकीकडे सत्ताधार्‍यांमध्ये भाऊबंदकी आहे, तर दुसरीकडे प्रशासनावर अंकुश नाही. खुद्द महापौरही म्हणतात, माझे कोणी ऐकत नाहीत. यानिमित्ताने महापालिकेच्या सभागृहाबाहेर निर्णय केंद्र असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. तर सत्ताधार्‍यांवर अंकुश ठेवणार्‍या विरोधकांचीही वानवा दिसते आहे.

16 फेब्रुवारी 2012 रोजी मतदान झाले तर 17 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला. दररोज पाणीपुरवठय़ांसह अशा जवळपास 31 आश्वासनांची खैरात कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने केली. दोन्ही पक्षांनी स्वतंत्र जाहिरनामे दिले. पाच वर्षांसाठी जाहीरनामा असला तरी वर्षभराचा कारभार पाहता अंमलबजावणीच्या पातळीवर खूपच संथगती दिसते आहे.

दुसरीकडे सत्ताधार्‍यांवर अंकुश ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्ष व शिवसेनेला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून सोलापूरकरांनी संधी दिली. पण त्यांच्यातही वानवाच दिसते आहे. महापौरांवर कचर्‍यांच्या टेंडर प्रकरणावरून आरोप होत आहे. ड्रेनेजच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सत्ताधारी पक्षातीलच नगरसेवक मनोहर सपाटे आरोप करीत आहेत.

शहरात पाणी नाही म्हणून विरोधी पक्षाने मोर्चा काढला. ड्रेनेज योजनेच्या कामाचा प्रारंभ केला, हे मात्र आघाडीच्या दृष्टीने वर्षभरात जमेची बाजू आहे. विरोधी पक्षनेत्या रोहिणी तडवळकर याही सत्ताधार्‍यांना फारशा कोंडीत पकडू शकल्या नाहीत. उलट त्यांच्याबरोबर कार्यक्रमात हजेरी लावून विरोधकांची धार कमी केल्याचा त्यांचावर आरोप होत आहे.

खासगीकरणाचे प्रयोग ठरले वादग्रस्त
यंदा महापालिकेत खासगीकरणाचे दोन प्रयोग झाले. पथकर वसुलीसाठी एका खासगी कंपनीस मक्ता देण्यात आला. मात्र, तो प्रयोग अपयशी ठरल्याने निर्णय मागे घेण्यात आला. कचरा सफाईचे खासगीकरण करण्यात आले आहे. मात्र, तो निर्णयही वादग्रस्त ठरला.

फक्त तीन कामांची प्रक्रिया सुरू
दिलेल्या आश्वासनापैकी हुतात्मा स्मृती मंदिर नूतनीकरण पॉवर ग्रीडच्या माध्यमातून प्रक्रिया सुरू आहे. मागील पंचवार्षिक योजनेत मंजूर असलेले ड्रेनेज आणि रस्त्याची कामे सुरू आहे. उजनीच्या दुहेरी पाइपलाइनचे काम एनटीपीसीच्या माध्यमातून मंजूर झाले आहे. त्यासाठी महापालिकेने प्रयत्न केले नाहीत. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वैयक्तिक इच्छाशक्तीमुळे ती कामे मंजूर झाली.

दररोज पाणीपुरवठा (अजूनही एक दिवसाआडच)
212 कोटींची ड्रेनेज लाइन (काम सुरू पण विस्कळीत)
239 कोटींचे रस्ते (कामाला सुरुवात)
उड्डाण पूल व भुयारी रस्ते बांधणे (अद्याप काहीच नाही)
नाला बांधकाम (अद्याप काहीच नाही)
राजीव आवास योजना (कागदोपत्री प्रक्रिया)
परिवहनच्या जागेत बीओटी प्रकल्प (रखडलेल्या स्थितीत)
स्मशानभूमीची सुधारणा (अद्याप काहीच नाही)
रिपन हॉल संग्रहालय (अद्याप काहीच नाही)
पाणी व विजेचे ऑडिट (अद्याप केले नाही)
शहरात सीसीटीव्ही व सिग्नल यंत्रणा (अर्धवट स्थितीत)

वर्षभरातील आघाडीच्या कामावर समाधानी आहे
महापालिका निवडणुकीत दररोज पाणीपुरवठा करण्याचे वचन काँग्रेसकडून देण्यात आले होते. पण, पाण्याची उपलब्धी नसल्याने ते शक्य झालेले नाही. एकंदरीत सोलापुरातील परिस्थिती पाहता पाणीपुरवठय़ाबाबत आम्ही समाधानी असून, जालनासारख्या शहरात दहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जातो. सोलापुरात मात्र एकदिवसाआड पुरवठा होतो. आम्ही केलेल्या कामाची माहिती नागरिकांना लवकरच सांगणार आहोत. त्यानुसार नगरसेवकांकडून माहिती घेण्याचे काम सुरू आहे.’’
-धर्मा भोसले, शहराध्यक्ष, काँग्रेस

कामे सुरू आहेत, पण पूर्णपणे समाधानी नाही
महापालिकेच्या कामाबाबत पूर्णपणे समाधानी नाही. महापालिका प्रशासनच ढिम्म असल्याने आमच्या कामाला गती दिली जात नाही. रोज पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, पाण्याची उपलब्धता कमी असल्याने ते पूर्ण होऊ शकले नाही. आमच्या पक्षाच्या सहा नगरसेविका नवीन असून कामाची पद्धत माहीत नाही. पाणी प्रश्नावर महत्त्व देऊन काम करीत आहोत. नगरसेवक दीपक राजगे यांचा वॉर्ड विकास निधी पाण्यावर खर्च केला. आम्ही प्रयत्न करीत आहोत, पण वर्षात मी पूर्णपणे समाधानी नाही.’’ महेश गादेकर, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस