आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘समीक्षा’स दीड कोटी आगाऊ देण्याचा धक्कादायक निर्णय

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहरातील कचरा उचलणार्‍या समीक्षा कन्स्ट्रक्शन कंपनीला वाहने खरेदीसाठी सुमारे दीड कोटी रुपये आगाऊ रक्कम महापालिकेने देण्याचा निर्णय घेतला. तो कराराचा भाग नव्हता. महापालिकेची तिजोरी रिकामी असताना इतकी मोठी रक्कम सात वर्षांसाठी बिनाव्याजी देण्याचा निर्णय झाला. यात मोठी आर्थिक देवाण-घेवाण झाली आहे. या कामी 16 अधिकारी व पदाधिकार्‍यांना ‘समीक्षा’ने बंद पाकिटे दिल्याचा थेट आरोप बहुजन समाज पक्षाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

लेखापरीक्षक कार्यालयाने नकारार्थी अभिप्राय देत चोख भूमिका बजावली असून नियमबाह्य पद्धतीने काम करत अधिकारी व राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी ही रक्कम देण्याचा निर्णय घेतल्याचा दावा र्शी. चंदनशिवे यांनी केला. कामे केलेल्यांची बिले वेळेवर दिली जात नाहीत. त्यांना पैसे नसल्याची सबब पुढे करण्यात येते. समीक्षा कंपनीवर इतकी मेहरबानी का? असा प्रश्न त्यांनी विचारला.

कचरा उचलण्याच्या कामाचे महापालिकेने खासगीकरण केले आहे. त्याचा मक्ता समीक्षा कन्स्ट्रक्शनला ऑगस्ट 2012मध्ये मिळालेला आहे. दोन महिन्यांनंतर कंपनीने वाहने खरेदी करण्यासाठी आगाऊ रकमेची मागणी केली. चार लहान जेसीबी (बॉब कट) आणि घंटागाडीसाठी 11 मॅक्झिमा वाहने खरेदी करण्यासाठी एक कोटी 66 लाख रुपयांची गरज आहे. त्यापैकी 90 टक्के रक्कम म्हणजे एक कोटी 49 लाख 40 हजार रुपये महापालिकेने बिनव्याजी द्यावेत. उरलेली 10 टक्के रक्कम कंपनी भरेल. महापालिकेच्या रकमेची सात वर्षात परतफेड करण्यात येईल. ही रक्कम बिलातून वजा करावी, असा प्रस्ताव आरोग्य अधिकार्‍यांनी दिला आहे.

लेखापरीक्षकांचा सूचक अभिप्राय
आगाऊ रक्कम देणे करारातील शर्त नाही. तसेच इतकी मोठी रक्कम बँक हमीखेरीज देणे महापालिकेच्या हिताचे नाही. कोणत्या नियमाखाली हा प्रस्ताव आरोग्य अधिकार्‍यांनी सादर केला याचा खुलासा करावा. 31 ऑक्टोबर 2012मध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला असल्यास ती प्रशासकीय बाब असून निर्णय त्याच स्तरावार अपेक्षित आहे. यात लेखापरीक्षकांच्या अभिप्रायाची गरज नसल्याचे नोव्हेंबर 2012च्या पत्रात म्हटले आहे.

लेखी तक्रार करावी
समीक्षा कन्स्ट्रक्शनबाबत पदाधिकारी आणि अधिकार्‍यांच्या उपस्थितीत निर्णय झाला. तो अगदी योग्य आहे. त्यामध्ये काहीही चुकीचे अथवा गैरप्रकार झालेला नाही. कोणाला काय आरोप किंवा तक्रार करायची आहे त्यांनी लेखी तक्रार करावी. त्याचे लेखी उत्तर दिले जाईल.’’
-अजय सावरीकर, आयुक्त

अब्रुनुकसानीचा दावा करेन
माझ्यावर पैशाच्या गैरव्यवहाराचा ठपका ठेवत असेल तर अब्रुनुकसानीचा दावा करेन. कुठलेही काम चुकीचे केले नाही. संशय असेल तर चौकशी करावी. बैठकीत समीक्षा कन्स्ट्रक्शनकरिता फक्त दोन बॉबकॅट विकत घेण्यास मंजुरी दिली होती. बाकी सर्व प्रशासनाने परस्पर वाढवले आहे. समीक्षा कन्स्ट्रक्शनच्या दोनही पत्रांची चौकशी केली जाईल.’’
-अलका राठोड, महापौर

16पैकी मोठी नावे गुलदस्त्यातच!
31 ऑगस्ट 2012 रोजी झालेल्या बैठकीत 16 वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकारी यांनी हा निर्णय घेतला. महापौर अलका राठोड, आयुक्त अजय सावरीकर यांच्यासह सफाई अधीक्षक आर. एम. तलवार, कारकून संजय होटकर, पुजारी, आरोग्य अधिकारी जयंती आडके यांची नावे घेतली. मात्र, सत्ताधारी राजकीय पक्षांतील मोठी नावे घेणे त्यांनी टाळले. याबाबत विचारले असता टप्प्याटप्प्याने नावे सांगणार आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय चर्चेला आणून ‘दूध का दूध और पानी का पानी’ करेन, असेही श्री चंदनशिवे यांनी सांगितले.