आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Municipal Corporation Last Ten GM Cancel

दहा महिन्यांत सोलापूर मनपाच्या नऊ सभा झाल्या तहकूब

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहर विकासाचे महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेतले जातात. त्यासाठी सभा बोलवण्याचा अधिकार महापौरांना असतो. शहर विकासाच्या महत्त्वपूर्ण प्रस्तावावर चर्चा होऊन अंतिम निर्णय सर्वसाधारण सभेत घेतले जातात. यावर पालिका प्रशासन अंमलबजावणी करते. मात्र, सत्ताधारी व अधिकार्‍यांना शहर विकासाचे गांभीर्य राहिलेले दिसत नाही. कारण गेल्या दहा महिन्यात नऊ सभा तहकूब झाल्या असून 204 प्रस्ताव प्रलंबित राहिले आहेत.

महापालिका निवडणुकीनंतर 6 मार्च 2012 रोजी अलका राठोड महापौर पदावर विराजमान झाल्या. त्यानंतर त्यांनी आतापर्यंत मे महिन्याची सभा वगळता अन्य नऊ महिन्यांची सभा तहकूब करण्यातच समाधान मानले आहे. या तहकूब सभांमुळे शहर विकासाचे महत्त्वपूर्ण 204 विषय प्रलंबित आहेत. यात आयुक्तांकडून आलेल्या 42 प्रस्तावावर तर पदाधिकार्‍यांच्या 162 प्रस्तावावर निर्णय झाला नाही. त्यामुळे मनपा प्रशासनास काम करण्यासाठी तांत्रिक अडचण निर्माण होत आहे. या उलट शहर, राज्य आणि केंद्र पातळीवरील नेत्याच्या मृत्यूचे कारण पुढे करीत सभा वारंवार तहकूब करण्यात येत आहे. नोव्हेंबर महिन्याची सभा यापूर्वी दोन वेळेस तहकूब झाली असताना पुन्हा तहकूब करण्यात आली. महापौर अलका राठोड यांच्या 11 महिन्याच्या कार्यकाळात आतापर्यंत 11 सभा झाल्या. त्यात पाण्याच्या प्रo्नावर एक विशेष सभा झाली. अन्य दहा मासिक सभेपैकी नऊ सभा तहकूबच आहेत. केवळ मे मधील विषय निकाली निघाले.

169 विषयांवरच निर्णय

महापौर राठोड यांनी अकरा सभा बोलवल्या. त्यात 373 विषय सर्वसाधारण सभेत आले. त्यापैकी 169 प्रस्तावांवर निर्णय झाला तर 204 प्रस्ताव निर्णयाविना पडून आहेत. एमआयडीसीतील पंपिग स्टेशनमध्ये पंप बसवणे, पाण्याच्या टाकीस वॉल कंपाउंड बांधणे, प्रतापनगर आणि कुमठे येथे सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी पंपिंग स्टेशनसाठी भूसंपादन करणे, जुळे सोलापुरातील रस्ते, पाइपलाइन घालणे, पारंपरिक ऊर्जा विकास अंतर्गत 1.55 कोटी निधी शासनाकडे मागणे आदी विषयांचा समावेश आहे.

फेब्रुवारीत सलग सभा घेऊ

मागील 11 महिन्यांतील 11 पैकी 10 सभा तहकूब झाल्या आहेत. प्रलंबित विषय घेण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात सलग सभा घेण्यात येईल. सर्व विषयांवर निर्णय घेण्यात येईल. आणि तातडीने मार्गी लावण्यात येईल.

एकाच विषयावर प्रदीर्घ चर्चा

सभागृहात एकाच विषयावर अनावश्यक चर्चा होत असल्याने विषय मंजूर होऊन मार्गी लागत नाहीत. काही जणांचे निधन झाल्यावर सभा तहकूब करणे आवश्यक असते. सभा सकाळी किंवा सायंकाळी बोलावली तरी सभेत प्रदीर्घ चर्चा होतेच.

जुलै 2010 ते मार्च 12 दरम्यान 260 प्रस्ताव प्रलंबित
माजी महापौर आरिफ शेख यांच्या कार्यकाळात जुलै 2010 ते मार्च 2012 पर्यंत घेण्यात आलेल्या सभेपुढील 260 प्रस्तावावर निर्णय झाला नाही. त्या विषयावर निर्णय होणे यापुढील काळात धुसर आहे. यात आयुक्तांकडून आलेले सुमारे 61 तर सभासदांचे 199 प्रस्ताव आहेत. चालू वर्षातील प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी सभेला वेळ मिळत नाही. त्यामुळे मागील प्रस्तावावर आता कोणता निर्णय होणार याबाबत साशंकता आहे.