आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर- जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निवडणुकीत महापौर अलका राठोड व मंगळवेढा नगरपरिषदेच्या सदस्या कलावती खंदारे यांचे अर्ज बाद झाले. समितीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधी सदस्यांच्या 40 जागांसाठी निवडणूक होत आहे. गुरुवारी अर्जांची छाननी झाली. दरम्यान, महापौर राठोड यांच्या दुसर्या अर्जावरही भाजप-शिवसेनेने हरकत घेतली आहे.
जिल्हा परिषद 27, महापालिका 9 आणि नगरपालिकांमधून 4 अशा एकूण चाळीस जागा आहेत. 105 अर्ज आले होते. महापौर राठोड यांनी दोन अर्ज दाखल केले. पण, एका अर्जावर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी करावयाच्या जागेवर सही केल्याने त्यांचा अर्ज बाद झाला. तर कलावती खंदारे यांनी अनुसूचित जातीसाठी अर्ज दाखल केला होता. पण, असे सदस्यत्वच नसल्याने त्यांचा अर्ज बाद झाला.
महापौर राठोड यांच्या दुसर्या अर्जावर महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या रोहिणी तडवळकर, शिवसेनेचे नगरसेवक भीमाशंकर म्हेत्रे, नगरसेविका शोभा बनशेट्टी यांनी हरकत घेतली आहे की, राठोड खुल्या वर्गातून निवडून आल्या असून त्यांनी मागास वर्गासाठी अर्ज दाखल केला आहे. माजी महापौर आरिफ शेख यांनी खुल्या वर्गातून निवडून आले असूनही मागास वर्गातून अर्ज दाखल केला. भाजप नगरसेविका नरसूबाई गदवालकर यांनी एससी पुरुष वर्गातून निवडणूक लढवली असून सर्वसाधारण एससी मधून अर्ज भरला आहे. काँग्रेसचे नगरसेवक देवेंद्र भंडारे सर्वसाधारण वर्गातून निवडून आले असून त्यांनी राखीव वर्गातून अर्ज दाखल केला आहे. अशा हरकती विरोधकांनी घेतल्या. या सर्वांवर निवडणूक निर्णय अधिकारी अशोक काकडे यांच्यासमोर सुनावणी पूर्ण झाली आहे. सोमवारी अंतिम यादी लागणार आहे. अर्ज बाद झालेल्यांना 30 जानेवारीपर्यंत जिल्हाधिकार्यांकडे अपिल करता येईल. 1 फेब्रुवारी रोजी ते निर्णय देतील. अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर 14 फेब्रुवारीला मतदान आणि 16 फेब्रुवारीला मतमोजणी आहे. छाननीत अर्ज बाद झालेल्या रिक्त जागांसाठी शासन आदेशानुसार पुन्हा निवडणूक प्रक्रिया राबविण्याची तरतूद आहे.
छाननी पूर्ण, दोन अर्ज बाद
जिल्हा नियोजन समिती निवडणुकीसाठी दाखल अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे. दोन अर्ज छाननीत बाद झाले असून चार अर्जावर दाखल हरकतींची सुनावणीही पूर्ण झाली आहे. 28 जानेवारीला निवडणूक लढविण्यास पात्र उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.’’
-अशोक काकडे, निवडणूक निर्णय अधिकारी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.