आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Municipal Corporation Neglected Defaulter

105 थकबाकीदारांवर मनपाची आहे मेहेरनजर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महापालिकेने पाच टक्के सवलत देऊन तीन महिन्यांपूर्वी कर वसुली मोहीम राबवली. सर्वसामान्य नागरिकांनी प्रामाणिकपणे कर भरून आपले कर्तव्य बजावले. याउलट पाच लाखांपेक्षा अधिक कर थकबाकी असलेल्या 105 धनदांडग्या थकबाकीदारांकडील वसुलीकडे महापालिका मेहेरनजर दाखवत असल्याचे दिसते. विशेष म्हणजे मिळकत कराची थकबाकी असलेल्या थकबाकीदारांमध्ये माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी महापौर मनोहर सपाटे, कामगार नेते कुमार करजगी, उद्योजक सुनील मंत्री यांचे नेतृत्व असलेल्या संस्थांचा समावेश आहे. लक्षाधीश मंडळी मनपाचे लखोपती थकबाकीदार आहेत.

जुलै महिन्यात महापालिकेने मिळकतकर वसुली मोहिमेत काही ठिकाणी कर न भरणार्‍यांवर कारवाई केली. मात्र, धनदांडग्या थकबाकीदारांवर मेहेरनजर दाखवली गेली असल्यानेच थकबाकीदारांच्या यादीत ही नावे आल्याने स्पष्ट झाले आहे. 1 नोव्हेंबरपर्यंत मनपाचे 5 लाखांहून अधिक मिळकतकर थकबाकीदारांची संख्या 105 तर थकबाकी 12 कोटी 59 लाख 34 हजार 256 रुपये इतकी आहे. माजी पालकमंत्री ढोबळे, माजी महापौर मनोहर सपाटे, उद्योजक करजगी, बांधकाम व्यावसायिक सुनील मंत्री यांच्याशी संबंधित संस्था तसेच संध्या सावस्कर, किरण कनाळे, मल्लिनाथ शेटे यांच्याकडे मिळकत करापोटी पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी आहे.

असे आहेत वैयक्तिक लखपती थकबाकीदार
बापू ढंगेकर (13.76 लाख), व्ही. रामकृष्णा नायडू (5.01), सोमशेखर मल्लिकार्जुन देशमुख (6.25), मल्लिनाथ ईरणप्पा शेटे (5.14), शिवरूद्रप्पा उमाशंकर चाकोते (बीएसएनएल) (6.68), बाबूराव तात्याबा मोरेश्वर (7.40), किरण जयप्रकाश कनाळे (6.56), रजनीबाई अनिल आळंदकर (9.72), विलास केशवराव पाटील (12.88), डी. एस. सुरवसे (9.41), लक्ष्मी कुमार करजगी (5.32), गिरीजाबाई ढंगे (10.11), ताज प्लाझाचे ताजोद्दीन मुजाहिद्दीन (15.50), राजन गांधी (6.46), सुनील राजमाने (11.80), संध्या एस. सावस्कर (5.61), निलोफर महिबूब मुजावर (5.05).

या आहेत नेत्यांच्या थकबाकीदार संस्था
पोलिस अधिकारी ग्रामीण (24.77 लाख), मागास समाज सेवा मंडळ (5.12), जिल्हा क्रीडा अधिकारी (25.76), मुख्याध्यापक उर्दू कॅम्प शाळा (10.20), केंद्रीय विद्यालय रेल्वे (30.59), मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट (9.18), रेल्वे (7 कोटी), बेगम कमरून्निसा कारीगर गर्ल हायस्कूल (14.13), डॉ. बाबासाहेब आंबेडकर खादी ग्रामोद्योग ग्रामीण संघ (21), सोलापूर सोशल हायस्कूल (9.77), चेअरमन जुनी मील (16), मराठा समाज सुधारक मंडळ (17.24), उमा को. ऑप.(6.53). अरविंद धाम पोलिस वसाहत (34.23), उजनी कॅनाल उपविभाग (8.59), उमा सहकारी गृह निर्माण संस्था (11.06), कार्यकारी अभियंता भिमा विकास (5), चेअरमन भारती विद्यापीठ (6), हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालय (8.12).

रेल्वेकडे सात कोटींची थकबाकी
महापालिकेच्या थकबाकीदारांत सर्वाधिक थकबाकी रेल्वेची आहे. रेल्वेकडे सात कोटींची थकबाकी आहे. याशिवाय ग्रामीण पोलिस, शहर पोलिस, जिल्हा क्रीडा अधिकारी, जुनी पोलिस लाइन, मनपा उर्दू कॅम्प शाळा यांच्याकडे पाच लाखांपेक्षा जास्त थकबाकी आहे. तसेच एक, दोन, तीन, चार लाखांच्या पुढील थकबाकीदारांची यादी मनपाने तयार केली आहे.

शासनाकडून अनुदान नाही
शासनाकडून येणारे शिक्षणेत्तर अनुदान अकरा वर्षांपासून बंद असल्याने महापालिकेचा कर थकलेला आहे. आमची संस्था व्यावसायिक नसून सेवा पुरवणारी आहे. महापालिका संस्थेकडून व्यावसायिक दर आकारते. सवलतीचे दर आकारावे अशी आमची मागणी आहे. संस्थेकडे आर्थिक तरतूद नसल्याने थकबाकी राहिलेली आहे.’’ मनोहर सपाटे, अध्यक्ष, मराठा समाज सेवा मंडळ

धडक मोहीम राबवणार
पाच लाखांपेक्षा जास्त थकबाकीदारांची यादी तयार आहे. त्यांच्यावर कारवाईचे प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवणार आहे. 16 नोव्हेंबरपासून वसुलीची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. थकबाकीदारांची नळ जोडणी बंद करणे आदी कारवाई केली जाईल.’’ चंद्रभागा बिराजदार, मनपा, कर संकलन अधिकारी

आकारणीची चुकीची पध्दत
एका वर्षात करात दुप्पटीने वाढविले. आकारणी करताना योग्य प्रमाणात केले नाही. त्यांचे सर्व कागदपत्रे माझ्याकडे आहेत.माहिती अधिकार कायद्याखाली माहिती मागितली आहे. त्यांनी केलेली आकारणी मान्य नाही त्यामुळे थकबाकी आहे.’’ कुमार करजगी, उद्योजक