आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Municipal Corporation News In Marathi, Little Flowers School, Divya Marathi

लिटल फ्लॉवर्स स्कूलची प्रवेश प्रक्रिया सील; दोषी आढळल्यास पुन्हा प्रक्रिया

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - लिटल फ्लॉवर्स स्कूलच्या प्रवेश प्रक्रियेत अनेक त्रुटी आढळल्याने महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी विष्णू कांबळे यांनी शनिवारी प्रवेश प्रक्रिया सील केली. प्रवेश अर्जाची तपासणी केली असता प्रवेश अर्जाची पोच न देणे, नोंदणी क्रमांक नसणे, रजिस्टर नसणे आदी त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे कारवाई करण्यात आली. शाळा दोषी आढळल्यास प्रवेश प्रक्रिया पुन्हा राबवण्याचा आदेश निघेल. त्यामुळे पालकांना मनस्तापाची शक्यता आहे.


शिक्षण मंडळाने पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक प्रवेश प्रक्रियेसाठी वेळापत्रक जाहीर केले होते. त्याप्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी मुख्याध्यापकांच्या सभेत सूचनाही देण्यात आल्या होत्या. त्या सूचनांकडे एलएफसीने दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. याबाबत पालकांच्या तक्रारी येत असल्याने प्रशासनाधिकार्‍यांनी तपासणी करून कारवाई केली.
सर्व शाळांची तपासणी आवश्यक : शहरातील महत्त्वाच्या शाळांमध्ये मनमानी पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत असल्याच्या तक्रारी पालकांकडून येत आहेत. प्रवेश अर्ज देताना त्यावर क्रमांक नसणे, पालकांना व्यवस्थित माहिती न देणे, अर्जाची पोच न देण्याचे प्रकार अनेक शाळांमध्ये घडत आहेत. त्यामुळे अशा सर्व शाळांची तपासणी करण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे. नियमांचे पालन करणे शाळांना बंधनकारक आहे.


पुढे काय? प्रवेश प्रक्रियेचा अहवाल घेऊन एलएफसीच्या मुख्याध्यापकांना बोलावण्यात येणार आहे. नियमानुसार प्रवेश प्रक्रिया राबवण्याचे आश्वासन घेऊनच पुढील प्रवेशप्रक्रिया घेण्यात येईल. आधी प्रवेश अर्ज भरलेल्या पालकांची तारांबळ उडणार असली तरी पारदर्शकता येणार असल्याने पालकांसाठी हितकारक असाच हा निर्णय असेल. शाळा व प्रशासनाच्या बैठकीनंतरच पुढील प्रक्रिया ठरणार आहे.


दोषी आढळल्यास..
प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींबाबत शाळेकडून तत्काळ अहवाल मागवण्यात आला आहे. वेळापत्रक व सूचना दिल्या असतानाही प्रवेश प्रक्रियेत गोंधळ का, याची विचारणा करण्यात आली आहे. शाळा दोषी आढळल्यास प्रवेश प्रक्रिया पुन्हा राबवण्यात येईल.’’ विष्णू कांबळे, प्रशासनाधिकारी, शिक्षण मंडळ


सील केले म्हणजे काय केले?
सर्व प्रवेश अर्ज व संबंधित कागदपत्रे एका कपाटात बंद करण्यात आली. त्यानंतर कपाटाला कुलूप लाऊन त्यावर प्रशासनाधिकारी व पर्यवेक्षकांच्या सहीने काळा टॅग लावून सील करण्यात आले. प्रशासनाच्या मान्यतेशिवाय हे सील उघडताच येणार नाही. पुढील कार्यवाही होईपर्यंत हे सील असेच असेल.