आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Municipal Corporation News In Marathi, Tax Collection, Divya Marathi

थकबाकीदार हाजीर हो !मनपा बोलावणार 12 एप्रिल रोजी लोकअदालत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - पन्नास हजारांहून अधिक रुपयांचा मिळकत कर थकवणार्‍या मिळकतदारांकडून करवसुली करण्याचा नवा फंडा महापालिकेने योजिला असून, त्यासाठी 12 एप्रिल रोजी लोकअदालत बोलवण्यात आली आहे. कर थकवणार्‍या हद्दवाढ भागातील 657 थकबाकीदारांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. लवकरच त्यांना नोटीस पाठवली जाईल.


कराच्या अधिकाधिक वसुलीसाठी महापालिका मोहीम राबवत आहेत. कराची वसुली करण्यासाठी एप्रिलमध्ये लोकअदालत भरवण्याची तयारी मनपाने सुरू केली आहे, तर दुसरीकडे थकबाकीदार असलेले व्यापारी, कारखान्याच्या मिळकती सील करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली. नुकतीच लक्ष्मी मार्केट, एमआयडीसी भागातील दोन मिळकतींवर कारवाई केली आहे.


मार्चअखेर असल्याने एलबीटी, कर आकारणी, हद्दवाढ, भूमी व मालमत्ता, मंडई आदी विभागांनी वसुली मोहीम हाती घेतली आहे. 50 हजारांच्या पुढील मिळकतदरांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांना महापालिका नोटीस पाठवणार आहे. हद्दवाढ भागातील 657 जणांकडे 9.60 कोटींची थकबाकी आहे.


चादर कारखाना सील
हद्दवाढ भागातील व्यंकटेश नगरातील नरसय्या पुल्लय्या पसनूर यांच्या चादर कारखान्यांची 8.98 लाखांची थकबाकी असल्याने महापालिकेच्या वसुली पथकाने कारखाना सील केला.

लक्ष्मी मार्केटमध्ये गाळा केला सील
लक्ष्मी मार्केटमधील नवीन इमारत येथील नबिलाल अहमद रामपुरे यांचा तीन नंबर गाळा 37 हजार रुपयांच्या थकबाकीपोटी महापालिका मंडई विभागाने सोमवारी सील केला. या ठिकाणी 91 गाळे असून त्यांची थकबाकी 12.37 लाख इतकी आहे. त्यावरही कारवाई होणार आहे.

बिल्डरवर कारवाई
हद्दवाढ भागात अनेक बांधकाम व्यावसायिकांनी मोकळी जागा घेऊन ठेवली आहे. पण त्या जागेचा कर भरला जात नाही. अशा व्यावसायिकांच्या नावांची यादी तयार करण्याचे काम सुरू असून दोन दिवसांत अंतिम यादी तयार होईल. यादी तयार होताच त्यांना नोटीस देण्यात येणार आहे.

50 हजार रुपयांच्या पुढे थकबाकी असलेल्या मिळकतदारांना महापालिका नोटीस देणार आहे. याशिवाय लोकअदालतमध्ये हे प्रकरण घेण्यात येणार आहे. थकबाकी वसूल करण्यासाठी संबंधित मिळकतीवर बोजा चढवण्यात येणार आहे.’’ नमिता दगडे, साहाय्यक आयुक्त, मनपा