आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर महापालिका: घोटाळे करा, मौज करा, निश्चिंत राहा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महापालिकेतील विविध गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी समित्या स्थापन झाल्या. मात्र, या समित्यांकडून चौकशी होत नसल्याचे चित्र आहे. भूमी व मालमत्ता विभागातील भंडे गैरव्यवहार, औषध खरेदी, परिवहन विभागात पासमध्ये 3.5 लाखांच्या अपहारासह शिक्षण मंडळ बांधकामात 24 लाखांच्या कामांची चौकशी रखडली आहे. त्यामुळे या गैरव्यवहारांतील दोषींवर कारवाई करणेही अवघड झाले आहे.

भंडे घोटाळा
जेटिंगराया भंडे या लिपिकाने 2006 मध्ये भूमी व मालमत्ता विभागात 92 लाख रुपयांचा गैरव्यवहार केला. शासनाचे अधिकारी व्ही. सी. हंगे यांनी महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार चौकशी करून अहवाल सादर केला. भंडे यांच्यामुळे किती नुकसान झाले त्याची चौकशी करून अहवाल द्या, असा आदेश साहाय्यक आयुक्त (प्रशासन) यांनी डिसेंबर महिन्यात दिला. त्याची चौकशी मुख्य लेखापाल कार्यालयाकडून झालेली नाही.

औषध भांडार
औषध भांडारातील लिपिक अशोक गवळी यांनी कालबाह्य औषधे खरेदी केल्याची तक्रार आरोग्य सभापती राजकुमार हंचाटे यांनी केली होती. प्राथमिक अहवालावरून गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले. चौकशी करून गवळी यांना निलंबित करण्यात आले. नोव्हेंबर महिन्यात सविस्तर चौकशीचे आदेश मुख्य लेखापरीक्षक कार्यालयास दिले, तरी चौकशी झालीच नाही.

परिवहन विभाग
डबघाईत आलेल्या परिवहन विभागात बनावट मासिक पास देऊन जवळपास साडेतीन लाख रुपयांचा अपहार करण्यात आला. या प्रकरणी लिपिक र्शीमती मुन्नारेड्डी यांना निलंबित करण्यात आले. त्या प्रकरणाची चौकशी परिवहन आणि महापालिकेकडून अद्याप झाली नाही. दोन महिन्यांपासून हे काम प्रलंबित आहे.

शिक्षण मंडळ
पालिका शिक्षण मंडळाच्या कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी 24 लाख रुपये खर्च दाखवण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या निधीचा वापर यासाठी झाला. मागील समितीच्या काळात काम झाल्याने नवनियुक्त सदस्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. त्यासाठी सर्वपक्षीय समिती स्थापन झाली, पण चौकशी अद्याप सुरू झालेली नाही. समितीच्या बैठकीस महापालिकेच्या अधिकार्‍यांनी दांडी मारली. त्यामुळे ही चौकशी सुरूच होऊ शकली नाही.

सक्षम अधिकारी नाही
मासिक पासमध्ये गैरव्यवहाराच्या आरोपाची चौकशी होणे आवश्यक आहे. परिवहन विभागाकडे चौकशीसाठी सक्षम अधिकारी नसल्याने काम सुरू झालेले नाही. पंधरा दिवसांपूर्वी पत्र लिहून महापालिकेकडे चौकशी अधिकार्‍याची मागणी केली आहे.
-ए. ए. पठाण, परिवहन व्यवस्थापक

आठवड्यात पूर्ण होईल
भंडे आणि गवळी (औषध खरेदी) घोटाळ्यांबाबत चौकशी सुरू आहे. त्यासाठी कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात येत आहे. गवळी यांच्या बाबतीत आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्यास विलंब होत असल्याने चौकशी लांबली. एका आठवड्यात चौकशी पूर्ण केली जाईल.
-अशोक जोशी, मुख्य लेखापरीक्षक, मनपा