आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवास योजनेअंतर्गत झोपडपट्टीमुक्त कार्यशाळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ज्यांच्या नावाने हजार स्वेअर फूट जागा आहे त्यांना राजीव आवास योजना अंतर्गत नियमाप्रमाणे 270 स्वेअर फुटांचे घर मिळणार का? शासनाच्या जागेवर झोपडपट्टी वसली त्यांना घर देणार का? नाल्यावरील घराचे काय? 200 स्वेअर फूट जागा मालकास 270 आणि हजार स्वेअर फूट जागा मालकालाही 270 स्वेअर फूट हा दुजाभाव नाही का? आदी प्रश्नांची सरबत्ती नगरसेवकांनी केली. राजीव गांधी आवास योजना अंतर्गत शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे. त्याबाबत माहिती देण्यासाठी नगरसेवकांसाठी शुक्रवारी कार्यशाळा घेण्यात आली.

शहरात 220 झोपडपट्टय़ांमध्ये राजीव गांधी आवास योजना राबवण्यात येत असून, त्यापैकी सरकारी जागेत 50, मनपा जागेत 28 आणि खासगी जागेत 142 झोपडपट्या आहेत. 4 जुलै 2009 साली ही योजना पंतप्रधानांनी जाहीर केली. या योजनेची माहिती देण्यासाठी यापूर्वी दोन कार्यशाळा घेण्यात आल्या. शुक्रवारी पुन्हा घेण्यात आली. महापौर अलका राठोड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी सभागृह नेते महेश कोठे, कृष्णाहरी दुस्सा, नगर अभियंता सुभाष सावस्कर आदी उपस्थित होते.

सर्वेक्षण पूर्ण
शहरातील 70 झोपडपट्टय़ांचे सर्वेक्षण पूर्ण झाले. या योजनेसाठी वातावरणनिर्मिती, नियोजन प्रक्रिया, पुनर्विकास याबाबत अभ्यास करून अहवाल तयार करणे, बांधणी उपक्रम, कृती आराखड्याची कार्यपद्धती, कृती आराखड्याचे अपेक्षित परिणाम, संस्थात्मक रचना यामध्ये समावेश आहे.
दत्तात्रय चौगुले, तांत्रिक कक्ष अधिकारी

अद्याप पैसे नाहीत
राजीव आवास योजना अंतर्गत राज्यातील कोणत्याही शहरांकरिता बांधकामासाठी पैसे दिले नाहीत. नागरिकांच्या मनातील झोपडपट्टी हा शब्द काढणे महत्त्वाचे आहे. झोपडपट्टीधारकांना दिलेली सवलत म्हणजे हक्क झाला आहे. राजीव गांधी आवास योजना ही अशी योजना आहे की ती लोकप्रतिनिधी आणि नोकरशाहीच्या हातात आहे. प्रा. डॉ. व्ही. व्ही. कुलकर्णी

सर्वांचा सहभाग गरजेचा
या योजनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पण त्यावर मात करून नागरिकांमध्ये सामंजस्य भावना निर्माण करणे गरजेचे आहे. योजना यशस्वी करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. काही प्रश्न आहेत. त्यावर जनजागृती करणे आवश्यक आहे.
लक्ष्मण बाके, समाज विकास अधिकारी