आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Municipal Corporation Special Committee Not Well

सोलापूर महापालिकेच्या विशेष समित्या जणू शेरडीचे शेपूट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महापालिकेत आरोग्य, मंड्या व उद्यान, विधी समिती, शहर सुधारणा, कामगार व समाजकल्याण या समित्या केवळ कागदोपत्रीच राहत आहेत. स्थापत्य, महिला व बालकल्याण समिती वगळता या पाच समित्यांचे कामकाज होतच नाही. या समितींना अधिकार असले तरी संबंधित खातेप्रमुखांकडून निर्णय अथवा शिफारशींसाठी समित्यांकडे विषय पाठविले जात नाहीत. त्यामुळे समित्यांच्या बैठकाच होत नाहीत.

महापालिकेत महापौर, स्थायी समिती, उपमहापौर, सभागृह नेता, विरोधी पक्षनेता, महिला व बालकल्याण, स्थापत्य समिती यांच्या व्यतिरिक्त इतर समित्यांना फारसे अधिकार नाहीत. मुंबई प्रांतिक अधिनियम 1949 अंतर्गत शहर सुधारणा समितीस आयुक्तांनी काढलेल्या अधिसूचनेला पसंती देण्याचा अधिकार आहे. सुधारणा योजनेत फेरफार करण्याचा अधिकार असला तरी त्याचा वापर होत नाही. त्यामुळे सातपैकी पाच विषय समित्या बिनकामाच्या आहेत. नाममात्र सभापती आहेत. मावळत्या वर्षात आरोग्य समितीच्या तीन, तर शहर सुधारणा समितीची एक सभा झाली. अन्य तीन समित्यांचे कामकाज चाललेच नाही.


विषय येत नाहीत
संबंधित खातेप्रमुखांमार्फत विषय येत नसल्याने समितीची सभा घेतलीनाही. पाच समित्यांचे विषय येत नाहीत. त्यामुळे सभा होत नाही.’’ ए. ए. पठाण, नगरसचिव, मनपा

महिन्याला एक सभा
आरोग्य समितीच्या गेल्या वर्षी दोन ते तीन सभा झाल्या. यावर्षी महिन्याला एक सभा घेणार आहे. औषध भांडारगृहातील घोटाळ्याचा छडा लावणार आहे. माझ्या कार्यकाळात सभा घेण्याचा प्रयत्न करणार आहे.’’ सुभाष डांगे, आरोग्य समिती, सभापती

उद्यान समितीला संधी
मला काही तरी करायचे आहे म्हणून मी पक्षाकडे मंड्या व उद्यान समिती मागवून घेतली. शहरात मुलांना खेळण्यासाठी बगिचा नाही. एक तरी बगीचा तयार करणार आहे. आरोग्य समितीचे कारभार होत नव्हते. तेथे असताना काही करण्याचा प्रयत्न केला. उद्यान विभागाकडे लक्ष घालणार आहे.’’ कुमुद अंकाराम, मंड्या व उद्यान, सभापती

नावाला समित्या आहेत
गेल्या वर्षी शहर सुधारणा समितीचा सभापती होतो. काम करण्याची इच्छा होती. सुरुवातीस एक बैठक झाली. त्यानंतर समितीकडे विषय आले नाहीत. समित्या नावाला आहेत.’’ अविनाश पाटील, माजी सभापती, शहर सुधारणा

असतील तर पाठवतो
विभागाकडे फारसे विषय नसतात, विषय असेल तर पाठवतो. आतापर्यंत स्थायी समितीकडे पाठवत होतो. सूचना आल्यातर विषय समितीकडे पाठवू.’’ प्रवीण दंतकाळे, खातेप्रमुख, कामगार व समाजकल्याण