आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूरचे नूतन बसस्थानक कुणी रखडवले!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - जुना पुणे नाका येथील 797 चौरस मीटर जागा संपादित करून जिल्हाधिकारी कार्यालयाने 1992 मध्ये एसटी महामंडळाच्या ताब्यात दिली. वीस वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही त्या जागेवर नूतन बसस्थानक उभारण्यात महामंडळाला यश आलेले नाही. विशेष म्हणजे, मागील आठ वर्षांपासून महामंडळाच्या अध्यक्षपदी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक आहेत.जागा ताब्यात असताना आणि बीओटीवर बसस्थानक उभारण्यासाठी 2004 मध्ये निघालेले टेंडर रद्द का झाले? याचा जाब आता सोलापूरकरांनी विचारावा.

जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गतच्या विशेष भूसंपादन कार्यालयाने 15 जुलै 1989 रोजी नूतन बसस्थानकासाठी 797 चौरस मीटर जागेचे संपादन केले. संपादित जागा 1992 मध्ये एसटी महामंडळाच्या ताब्यात दिली. यापैकी 273 चौरस मीटर जागेवरील अतिक्रमण काढण्याबाबत न्यायालयाने आदेश दिले. पण, संबंधिताने म्हणणे मांडण्याची संधी दिली नसल्याचे सांगत न्यायालयात धाव घेतली होती. संबंधितास म्हणणे मांडण्यासाठी तीन वेळा संधी दिल्याचे न्यायालयात आपण सिद्ध केल्याने निकाल नुकताच आमच्या बाजूने लागला आहे. न्यायालयातील प्रकरण जागेसंदर्भात नव्हते तर म्हणणे मांडण्याची संधी दिली नसल्याने न्यायालयाचा अवमान झाल्याचे होते, असे उपजिल्हाधिकारी ए. जी. वासुदेव यांनी सांगितले.

झारीतील शुक्राचार्य कोण? - एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी सलग आठ वर्षांपासून सोलापूरला संधी मिळत आहे. अध्यक्ष सुधाकर परिचारक यांनी पुढाकार घेऊन आपल्या सोलापूरचे बसस्थानक बीओटीवर भव्य करण्यासाठी आग्रह धरणे आवश्यक होते. पण तसे न होता काढण्यात आलेले टेंडर रद्द झाले आहे. वीस वर्षांपासून जागा ताब्यात असतानाही नूतन बसस्थानक न उभारण्यामागे नेमके कारण काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सोलापूर शहरावर राज्य करणार्‍या काँग्रेसनेही या प्रकरणात लक्ष का घातले नाही? आजही महामंडळाचे अध्यक्षपद सोलापूरकडेच असतानाही नूतन बसस्थानकाच्या कामाला गती का नाही? असे असंख्य प्रश्न सोलापूरकरांसमोर आहेत.
जागा मोक्याच्या, पण दुर्लक्षित? - शहरातील जुना पुणे नाका आणि शास्त्रीनगर या मोक्याच्या भागांत महामंडळाची मुबलक जागा आहे. जागा विकसित करून नूतन बसस्थानक बांधण्यासाठी महामंडळाला एक रुपयाही खर्च करावयाचा नाही. बीओटी तत्त्वावर बसस्थानक उभारण्याचा निर्णय घेतल्यास महामंडळाला महसूल तर मिळणारच आहे. भाड्याच्या स्वरूपातही दरमहा उत्पन्न वाढणार आहे. असे असतानाही महामंडळाने उदासीनता दाखविण्यामागे नेमके काय कारण हे समजत नाही. बसस्थानकांचा विकास न होण्यामागे राजकारण असल्याची चर्चा आहे.
काँग्रेसची उदासीनता न समजणारी - एसटी महामंडळाचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. सोलापूर शहरात काँग्रेसचे वर्चस्व, तर ग्रामीण भागात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. सोलापूर शहरातील बसस्थानक विकसित करण्याकडे होत असलेले राष्ट्रवादीचे दुर्लक्ष समजण्यासारखे आहे. पण, काँग्रेसकडून यासाठी पाठपुरावा का केला जात नाही? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण, बीओटीवर बसस्थानक उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मंजुरी आवश्यक आहे. मुख्यमंत्री काँॅग्रेसचे असल्याने याबाबत सोलापूरच्या काँग्रेस नेत्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे, अन्यथा नूतन बसस्थानकाची जागाही कोणी तरी बळकावण्याची शक्यता आहे.
बसस्थानकाची दुरवस्था - पांजरपोळ चौकात असलेल्या सध्याच्या बसस्थानकाची जागा 1 जानेवारी 1949 रोजी 99 वर्षांच्या कराराने 10 हजार 324 रुपये वार्षिक भुईभाड्याने घेण्यात आली होती. आज शहराची लोकसंख्या दहा लाखांपर्यंत पोहोचली असून, रत्यावरील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बसस्थानकाच्या परिसरात नेहमीच रिक्षांसह इतर वाहनांची इतकी वर्दळ असते की, इथे नेहमीच ट्रॅफिक जामची समस्या असते. इन व आऊट गेटमध्ये रिक्षांचा सर्रास वावर असतो. बसस्थानकाच्या मुख्य छताला तडे गेले असून, ते भविष्यात धोकादायक ठरू शकते. अपुर्‍या फलाटांमुळे येणार्‍या व जाणार्‍या गाड्या स्थानकात अस्ताव्यस्त उभ्या असतात. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
बीओटी टेंडर रद्द - जुना पुणे नाका येथील जागेवर बीओटी तत्त्वावर नूतन बसस्थानक उभारण्यासाठी 2004-05 मध्ये टेंडर काढण्यात आले होते. बसस्थानक उभारण्याचे काम दोन वर्षांत पूर्ण करून महामंडळाला 66 लाख रुपये मिळणार होते. परंतु, 2009 मध्ये हे टेंडर रद्द झाले. सुधाकर परिचारक एसटी महामंडळाचे अध्यक्ष असतानाही नूतन बसस्थानक झाले नाही. मात्र जिल्ह्यातील अकलूजचे बसस्थानक नव्याने भव्य करण्यात आले. नुकतेच पंढरपूरचे बसस्थानकही बीओटीवर उभारण्यात आले आहे. सोलापूर-पुणे महामार्गावरील इंदापूरचे बसस्थानक सुसज्ज झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे बसस्थानक बीओटीवर करण्यात आले असून, ते विमानतळासारखे सुसज्ज झाले आहे.
27 एकर जागा पडून - एसटी महामंडळाने चिंचोळी औद्योगिक वसाहतीत 4 डिसेंबर 1989 रोजी वर्कशॉपच्या उभारणीसाठी 27 एकर जागा घेतली. विशेष म्हणजे, 1997 मध्ये वर्कशॉप बांधण्यासाठी टेंडरही काढण्यात आले होते. पण आजही या जागेवर काहीच उभारलेले नाही. 1991 पासून आजपर्यंत फायर व सर्व्हिस टॅक्सपोटी दरमहा 12 ते 36 हजार इतकी रक्कम भरली गेली. वीस वष्रे ही जागा वापराविनाच पडून राहिली आणि लाखो रुपयांचा करही भरला गेला. जागा वापरात नसल्याने एमआयडीसी कार्यालयाने नोटीस पाठवून जागा परत करण्याची सूचना महामंडळाला केली आहे. सोलापूर जिल्ह्याकडे अध्यक्षपद असतानाही महामंडळाची ही उदासीनता दिसून येते.
शास्त्रीनगर स्थानकाचे टेंडर रद्द - पूर्वभागातील लोकांची सोय व्हावी म्हणून अशोक चौक परिसरातील शास्त्रीनगर बसस्थानकासाठी सात एकर जागा घेण्यात आली. या जागेवर मुक्कामी एसटी बस थांबवणे आणि कर्मचार्‍यांसाठी चार मजली विर्शामगृह बांधण्यासाठी 2000 मध्ये 36 लाख 64 हजार रुपये खर्चाचे इस्टिमेट करून टेंडरही काढण्यात आले होते. पण ते टेंडरही नामंजूर करण्यात आले. सध्या या बसस्थानकाची दुरवस्था झाली असून, येथे एखादी, दुसरी बस असते. बसस्थानकाचा परिसरही अगदी अस्वच्छ झालेला आहे. या बसस्थानकचा वापरही अगदीच कमी आहे. महामंडळाचे अध्यक्ष सुधाकर परिचारक यांनी याबाबत जातीने लक्ष घालून एसटी बसस्थानक विकसित करण्याची आवश्यकता आहे.
दोन महिन्यांत काम सुरू होईल - होय, सोलापूरच्या नूतन बसस्थानकाचे काम रखडलेले आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत हे काम सुरू होईल. नवीन बसस्थानक प्रवाशांना थोडेसे लांब पडेल. सोलापूरच्या बसस्थानकाची पाहणी केली, स्वच्छतागृहे अस्वच्छ होती. त्यामुळे तीन वेळा ती नव्याने बांधण्यात आली असून ती स्वच्छ ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.’’ सुधाकर परिचारक, अध्यक्ष, एसटी महामंडळ
राजकारण बाजूला ठेवून काम - बसस्थानकाची खरंच दुरवस्था आहे. लोकांच्या सुविधेसाठी नूतन बसस्थानक होण्याची गरज आहे. विकासात राजकारण आणण्याची गरज नाही. राष्ट्रवादी हा आमचा मित्रपक्ष आहे. राजकारणामुळे लोकांचे हाल होऊ नयेत. राजकारण बाजूला ठेवून विकास झाला पाहिजे आणि तो आम्ही नक्कीच करू ’’ प्रणिती शिंदे, आमदार, शहर मध्य, सोलापूर
बसस्थानकासाठी पाठपुरावा - जुने पुणे नाका येथील जागा वीस वर्षांपूर्वी ताब्यात आली आहे. पण काही जागेबाबत वाद होता. नवीन जागेत बीओटीवर बसस्थानक उभारण्यासाठी टेंडरही काढण्यात आले होते, पण ते टेंडर रद्द झाले आहे. आता पुन्हा वरिष्ठ कार्यालयाकडे नवीन बसस्थानकासाठी पाठपुरावा केला जाईल. सध्याच्या बसस्थानकावर सर्वतोपरी सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.’’ धनाजी थोरात, विभाग नियंत्रक, सोलापूर