आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सात - बारा उता-यातील नोंद प्रकरणी आणखी तीन तलाठी निलंबित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सात-बारा उतार्‍यावरील नोंदी प्रमाणित न केल्याबद्दल कोंडीचे तलाठी संतोष फुलारी, बाळेचे तलाठी यशवंत चिंचोळे व शहर कार्यालयातील तलाठी रावसाहेब कोकरे यांना गुरुवारी प्रांताधिकारी शहाजी पवार यांनी निलंबित केले. नोंदी प्रलंबित प्रकरणात मंडलाधिकारी प्रवीण घम यांच्या निलंबनापाठोपाठ आता तीन तलाठय़ांवर कारवाई झाली आहे.
शहरातील मालमत्तांच्या 5 हजारांहून अधिक नोंदी सात-बारा उतार्‍यावर प्रलंबित असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. मंडलाधिकार्‍यांनी फेरफारवर नोंदी करूनही संबंधित तलाठय़ांनी सातबारा उतार्‍यावर जाणीवपूर्वक नोंदी प्रमाणित केल्या नसल्याचे तपासणीत समोर आले होते. यामध्ये बाळे, कोंडी व शहर तलाठी कार्यालयातील प्रकरणांची संख्या मोठी होती.
यामुळे या तीनही तलाठय़ांना निलंबित करण्यात आले. संतोष फुलारी हे जून 2013 पासून कोंडी तलाठी कार्यालयात कार्यरत होते. तर रावसाहेब कोकरे व यशवंत चिंचोळे हे गेल्या दोन वर्षांपासून तलाठी कार्यालयात कार्यरत होते.


कोंडी, बाळे आणि शहरातील तलाठय़ांना दणका
शहर हद्दीतील बिनशेती प्रकरणांची तपासणी सुरू आहे. यामध्ये कोंडी येथील एका बिनशेती प्रकरणाची फाईलच गहाळ झाली आहे. ज्या प्रकरणांना नगर रचना कार्यालयाची परवानगी न घेता मंजुरी दिली, ती प्रकरणे नियमित करण्यात येतील. बोगस प्रकरणात संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी

सात-बारा उतार्‍या संदर्भातील नोंदी प्रमाणित न करणे गंभीर स्वरूपाची अनिमितता समजली जाते. संतोष फुलारी, यशवंत चिंचोळे व रावसाहेब कोकरे या तीन तलाठय़ांना निलंबित करण्यात आले आहे. मंडलाधिकार्‍यांनी केलेल्या नोंदी सातबारा उतार्‍यावर जाणीवपूर्वकपणे केल्या नसल्याचे तपासणीत समोर आले होते. त्यानुसार ही कारवाई झाली. अंजली मरोड, तहसीलदार


शहर तलाठी कार्यालय सोमवारपासून खुले
शहर तलाठी कार्यालयात गुरुवारपासून फेरफार व सात-बारा उतार्‍यावरील प्रलंबित नोंदी नियमित करण्याचे काम गतीने सुरू झाले आहे. याशिवाय बिनशेती मंजुरीची प्रकरणे तपासली जात आहेत. सोमवारपर्यंत ही कामे पूर्ण होतील. सोमवारपासून शहर तलाठी कार्यालय नागरिकांसाठी खुले होणार आहे. या नोंदी नियमित करण्यासाठी 9 मंडलाधिकारी आणि 18 तलाठी कार्यरत आहेत. यासंदर्भातील अहवाल जिल्हाधिकार्‍यांना सादर केला जाणार असल्याचे तहसीलदार अंजली मरोड यांनी सांगितले.