आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, After Heavy Rain Rescue Work In Solapur

वादळी पावसानंतर मदत कार्य सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - वादळी पावसामुळे बुधवारी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. गुरुवारचा दिवस उजाडताच महापालिका प्रशासनाने साफसफाईची मोहीम हाती घेतली. नुकसानग्रस्त लोकांच्या मदतीसाठी काही सामाजिक संघटना धावून आल्या. वीज वितरण मंडळाने सकाळीच दुरुस्तीची कामे हाती घेतली. पण रात्रीपर्यंत काही भागात वीजपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. नाराज झालेल्या नागरिकांनी जुळे सोलापुरातील वीज मंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर गोंधळ घातला.


बुधवारी सायंकाळी चार वाजता वादळी पावसानंतर रात्री पुन्हा जोरदार पाऊस झाला. यामुळे संध्याकाळी आणि रात्री प्रशासनास पुरेसे मदतकार्य करता आले नाही. गुरुवारी सकाळी महापौर अलका राठोड, उपमहापौर हारुन सय्यद, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, उपायुक्त डॉ. पंकज जावळे, महिला व बाल कल्याण समिती सभापती फिरदोस पटेल यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. उन्मळून पडलेली झाडे रस्त्यावरून काढून साफसफाई करण्याच्या सूचना आयुक्तांनी महापालिका प्रशासनास दिल्या. नगरसेवक बाबा मिस्त्री, तौफिक शेख यांनी नई जिंदगी आणि शांती नगर भागात पाहणी केली. जखमींची विचारपूस करून शासकीय रुग्णालयात उपचार करून घेण्याकरता आणि घरावरील पत्रे बसवून देण्याकरता कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. तौफिक शेख यांनी नुकसानग्रस्त लोकांपैकी अतिगरजू लोकांना आपल्या क्षमतेनुसार आर्थिक मदत केली.


परीक्षेच्या दिवसात अंधार
जुळे सोलापूर भागात बुधवारी सायंकाळी पाच वाजता गायब झालेली वीज गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरू झालेली नव्हती. जुळे सोलापुरातील डीपीत बिघाड झाल्याचे महावितरणने सांगितले. पण तो 24 तासांत सुरू करता आला नाही. सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. तर चार दिवसात दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत.


संतप्त नागरिकांकडून जुळे सोलापुरातील वीज कार्यालयाची तोडफोड
जुळे सोलापूर परिसरातील निम्मा भाग अंधरात आहे. ही परिस्थिती गुरुवारी रात्रीपर्यंत होती. नागरिकांनी वीज कधी येणार हे विचारण्यासाठी वीज कार्यालयाच्या दूरध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण प्रतिसाद न मिळाल्याने चिडलेल्या नागरिकांनी गुरुवारी संध्याकाळी जुळे सोलापूर येथील वीज कार्यालयात घुसून फर्निचरची तोडफोड केली. वीज वितरण विभागाचे शहर विभागाचे कार्यकारी अभियंता आर.आर.कांबळे यांनी घटनास्थळी जाऊन नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. गोंधळ वाढू नये आणि काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त बोलावण्यात आला.


नई जिंदगी भागात अनेक विजेचे खांब वाकले आणि विजेच्या तारा लोंबकळल्या. तर काही ठिकाणी विजेच्या तारांवर झाडे कोसळल्यामुळे अनेक तारा तुटल्या.
शांती नगर येथे विजेचा डीपी पूर्णपणे रस्त्यावर कोसळला. त्यामुळे वीज वितरण विभागाने गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासूनच काम हाती घेतले. तरीही नई जिंदगी, जुळे सोलापूर आणि विजापूर नाका झोपडपट्टीतील काही भागात रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नाही.


‘बालाजी सरोवर’चे नुकसान
होटगी रस्त्यावरील हॉटेल बालाजी सरोवरचे बुधवारच्या वादळी पावसात मोठे नुकसान झाल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. सौर ऊर्जा प्रणाली, काचा, फर्निचर आदींचे सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे पत्रकात म्हटले आहे.