आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Ambulance, Divya Marathi

अँम्ब्युलन्सचा सायरन रात्री दहानंतर वाजणार नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अँम्ब्युलन्स, अग्निशामक दल, आपत्ती निवारणात वापरात येणारी वाहने आणि पोलिस अधिकार्‍यांच्या वाहनांवरील सायरन आता रात्री 10 ते सकाळी सहापर्यंत वाजणार नाहीत. याबाबत राष्ट्रीय हरित लवाद (नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, नवी दिल्ली)ने दिलेल्या आदेशात मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत. त्याच्या पालनासाठी राज्याच्या गृह विभागाने परिपत्रक काढले. त्यानुसार सायरन व मल्टिटोन हॉर्न बसवलेल्या वाहनांवर निर्बंध येतील. उल्लंघन करणार्‍यांविरोधात ध्वनिप्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार कारवाई होणार आहे.

सायरन वाजवणार्‍या वाहनांवर निर्बंध आणण्यासाठी हरित लवादाने 9 जानेवारी 2013 रोजी आदेश दिले आहेत. त्याच्या पालनासाठी गृह विभागाने पोलिस आणि उपप्रादेशिक परिवहन खात्याला सूचना केल्या. ध्वनिर्मयादेच्या उल्लंघनासह रात्री दहाच्या पुढे सायरन वाजवणार्‍यांवर प्रदूषण नियंत्रण कायद्याने कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. वाहनांचे मालक, त्याचा वापर करणारे आणि शासकीय अधिकारी यांच्यावर कारवाई करता येते.

निर्बंध का आणि कशासाठी?
1. रुग्णाला ने-आण करण्यात गरज नसताना सायरन व मल्टिटोनचा वापर होतो. त्याचा इतरांना त्रास असतो.
2. रात्री दहा ते सकाळी 6 पर्यंत नागरिक शांतपणे झोपत असतात; परंतु सायरनच्या आवाजाने त्यांची झोपमोड होते.
3. रुग्णालय परिसर, मुख्य रस्ते, राज्य व राष्ट्रीय महामार्गालगतच्या घरांतील नागरिकांना त्रास होतो.

लवादाने काय म्हटले?
1. सायरन व मल्टिटोन बसवलेल्या वाहनांनी कोणत्याही क्षेत्रात रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत त्याचा वापर करू नये.
2. अतिशय आपत्कालीन स्थिती असेल तरच वापर करता येईल. शहराच्या हद्दीबाहेरील रस्त्यांवरही वापर करू शकता.
3. सायरन, मल्टिटोनच्या ध्वनीची र्मयादा ठरवून उपप्रादेशिक परिवहन खात्याने त्याचे स्टीकर्स वाहनांना द्यावेत.
राष्ट्रीय महामार्गालगत आमची सोसायटी आहे. रात्री जडवाहनांची प्रचंड वाहतूक असते. अधूनमधून अँम्ब्युलन्स किंवा पोलिसांच्या गाड्यांचे सायरन वाजतात. त्याचा खूप त्रास होतो. घरातील ज्येष्ठांची झोपमोड होते.अशा स्थितीत गृह खात्याच्या निर्णयाचे स्वागतच केले पाहिजे.’’ हार्दिक निमाणी, नागरिक