आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Congress, Divya Marathi, Legislative Council

सोलापुरातील काँग्रेसजनांना श्रेष्ठींचा ‘दे धक्का’,विधान परिषदेवर माढा मतदारसंघाला संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राज्यपाल नियुक्त आमदारकीपदासाठी काँग्रेस श्रेष्ठींनी माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस तालुक्यातील अँड. रामहरी रूपनवर यांना संधी दिली. या भागात काँग्रेसचे अस्तित्वच नाही तेथे त्याचा उपयोग काय? असा सवाल करीत सोलापूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसची ताकद असताना संधी न मिळाल्याने इच्छुक नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
राज्यपाल नियुक्त विधान परिषदेसाठी सोलापुरातुन विष्णुपंत कोठे यांचे नाव निश्चित मानले जात होते. तसेच जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब शेळके यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र, या दोघांनाही डावलून श्रेष्ठींनी माळशिरस तालुक्यातील रामहरी रूपनवर यांचे नाव विधान परिषदेचे आमदार म्हणून राज्यपालांकडे पाठविले. त्यामुळे सोलापुरातील काँग्रेसजन अस्वस्थ झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदार संघातील सांगोला वगळता एकाही विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे नाही. तेथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापचे वर्चस्व आहे. त्याउलट सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दक्षिण सोलापूर, शहर मध्य हे मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत.
आघाडी झाल्यास यापुढच्याही निवडणुकीत हेच चित्र राहणार आहे. त्यामुळे येणार्‍या विधानसभेत या नियुक्तीचे पडसाद उमटतील अशी उघड चर्चा आता काँग्रेसमध्ये जोर धरू लागली आहे.
निर्णय घेणारे श्रेष्ठी कोण?
विधान परिषदेवर कोणाला घ्यायचे याचा निर्णय श्रेष्ठींनीच घेतला, पण हे श्रेष्ठी कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोलापुरातील बहुतेक निर्णय माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना विचारूनच घेतले जातात असे आजवरचे चित्र आहे. मग या वेळी असा निर्णय झालाच कसा? याचीच चर्चा काँग्रेसमध्ये सध्या सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने शिंदे यांनी शहराऐवजी जिल्ह्यातल्या व्यक्तीला संधी दिली असावी, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. धनगर समाजाला संधी द्यायची होती म्हणून रूपनवर यांचे नाव नक्की झाले असे सांगितले जात आहे. सांगोल्यातून शहाजी पाटील, करमाळ्यातून जयवंत जगताप, पंढरपुरातून प्रकाश पाटील, सोलापुरातून विष्णुपंत कोठे, बाळासाहेब शेळके , सुधीर खरटमल अशी अनेक नावे होती. ती सर्व बाजूला पडून रूपनवर यांनी आमदारकी पदरात पाडून घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
प्रदेश कमिटीत काम केल्याचे फळ
रामहरी रूपनवर हे भाजपमधून काँग्रेसमध्ये आले. ते जिल्हा संघटक होते. नंतर प्रदेश सचिव म्हणून नियुक्त झाले. त्यानंतर त्यांनी माणिकराव ठाकरे यांच्याबरोबर प्रदेश काँग्रेस कमिटीत चांगले काम केले, त्यामुळेच त्यांना ही संधी मिळाल्याची चर्चा सध्या ते काँग्रेसमध्ये आहे. शिवाय, जातीय समीकरणाचाही त्यांना फायदा झाला.