आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Congress, Nationalist Congress Party, BJP

कार्यकर्ते घडवणारी केंद्रे नावालाच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महापालिका ते लोकसभेपर्यंतच्या सत्तेची स्थानिक राजकीय केंद्रे म्हणून विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयांकडे पाहिले जाते. सोलापुरात काँग्रेस आणि भाजपचा जेवढा प्रभाव आहे तेवढी त्यांचीही कार्यालये सुसज्ज दिसत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व अन्य पक्षांची कार्यालये तर फिरतीच म्हणावी लागतील. राजकारणातील कार्यकर्ते घडवण्याच्या शाळा म्हणून पक्ष कार्यालयांकडे पाहिले जायचे. पण आज केवळ सत्तेची गणिते मांडणारी ठिकाणे, असेच त्याला स्वरूप मिळाले आहे. त्यामुळे पक्षसेवा होत नाही तेथे लोकसेवा होणार कशी? असाच प्रश्न पडतो.
सोलापूरला स्वातंत्र्यपूर्व काळापासून राजकीय घडामोडींचा मोठा इतिहास आहे. काँग्रेस कार्यालयांची वाटचाल पाहिली तर ती टिळक चौक व्हाया मुरारजी पेठ ते काँग्रेस भवन अशी राहिली आहे. (कै.) अप्पासाहेब ब्रrानाळकर यांच्या कारकिर्दीत जवळपास 20 ते 25 वर्षे काँग्रेसचे कार्यालय मुरारजी पेठेत (सरस्वती चौक ते चार पुतळा) याठिकाणी होते. तेथूनच सर्व सूत्रे हलायची. पुढे परिस्थिती बदलली. अन् जिल्हा परिषदेसमोर काँग्रेस भवनात हा कारभार गेला. इमारत मोठी उभारली. त्या इमारतीत जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, सर्व फ्रंटल अध्यक्षांना बसण्याची उत्तम सोय झाली. पण कार्यकर्ते तयार करण्याचा ‘अँगल’ तेथेही दिसला नाही. आजही तेथे लायब्ररी केली नाही. पक्षाचा इतिहास, पक्षाचे कार्य, सत्तेत राहून केलेले कार्य, केलेले कायदे याचा कसलाही संबंध नसल्याचेच जणू काँग्रेस भवनला वाटते, अशी तेथील स्थिती आहे.
पक्षांना नाही गांभीर्य
निवडणुकांमध्ये मते मिळवण्यासाठी लोकांच्या समस्या सोडवण्याची आश्वासने देणारे आणि जिंकण्यासाठी सर्व काही करणार्‍या राजकीय पक्षांना स्वत:च्या कार्यालयांसाठी तेवढे गांभीर्य दिसत नाहीत. नगरसेवकांपासून ते खासदारांपर्यंतच्या निवडणुका जिंकण्याची सूत्रे जेथून हलतात त्या कार्यालयांची आजची स्थिती पाहिली तर ती केविलवाणीच म्हणावी लागेल.
नेतृत्वाप्रमाणेच फिरतात कार्यालये
शहरात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, माकप या पाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जनता दल, बहुजन समाज पक्ष, आम आदमी पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपाइंचे विविध गट, जनसुराज्य या शिवाय जवळपास डझनावर पक्षांच्या चळवळी सुरू आहेत. पण त्यांची कार्यालये कुठे आहेत, हे शोधावे लागेल अशीच स्थिती आहे. शिवसेनेलाही अजून स्थिर असे कार्यालय उभारता आले नाही. आता त्यांचे कार्यालय मंगळवार पेठेत थाटले गेले आहे. पक्षाचे नेतृत्व जसे बदलते तसे कार्यालयांची ठिकाणेही बदलतात हेच चित्र शहरातील राजकीय पक्षांचे दिसत आहे.
‘माकप’मध्ये चालते योजनांची चळवळ
मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यालय दत्त नगरमध्ये आहे. ते पत्र्याच्या शेडमध्ये असले तरी विडी योजनांमुळे त्याचे स्वरूपच पालटून गेले आहे. पूर्वी या ठिकाणी साहित्य, परिवर्तनाच्या चळवळीही चालायच्या. आज त्या बदलत्या राजकरणात राहिल्या नाहीत. मास्तरांची रोजची उपस्थिती असल्याने तेथे काहीशी गजबज दिसते. पण बदलत्या व अद्ययावत काळाचा वेध घेण्याला काही वाव नाही. राजकीय चळवळीपेक्षा तेथे योजनांची चळवळच जास्त दिसते आहे.
व्हिडिओ कॉन्फरन्स नावालाच
गेल्या वर्षात मुंबईतील टिळक भवनातील काँग्रेस भवनला इंटरनेटने जोडण्यासाठी ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’सेवा सुरू केली; पण त्याचा उपयोग झाला नाही. ती असून नसल्यासारखी आहे. मध्यंतरी एकदा मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष त्यावर दिसले, तेही काही मिनिटांसाठीच. काँग्रेस भवनातील शहराध्यक्षांचा दूरध्वनी क्रमांक 2624888 होता. तो आता दुसरीकडेच कुठे तरी लागतो आहे. लायब्ररी उभारण्याचे काम सुरू झाले होते, ते अर्धवटच राहिले.
‘राधा निवास’ नंतर भाजपचीही भटकंती
रेल्वे लाइन येथील भारतीय जनता पक्षाच्या ‘राधा निवास’नंतर पक्ष कार्यालयाची भटकंतीच होत राहिली. नवी पेठेनंतर आज शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागील बाजूस पक्षाचे कार्यालय थाटले आहे. भारतीय जनता पक्ष सध्या नवनवीन तंत्र अवलंबण्यात आघाडीवर असल्याचे चित्र सर्वत्र आहे. पण सोलापुरातील कार्यालय त्याला अपवाद ठरले आहे. एरवी पक्षाचे पदाधिकारीही कधीतरीच फिरकतात, असे कार्यकर्ते सांगतात.
‘राष्ट्रवादी भवन’ची नुसती चर्चाच
काँग्रेसपासून वेगळे झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जसजसे बदलले गेले तसतसे कार्यालयांची ठिकाणेही बदलत गेली. सिद्धेश्वर मंदिराजवळील गाळा, संत तुकराम चौक असे करीत आता ते कार्यालय शिंदे चौकात येऊन ठेपले आहे. ‘राष्ट्रवादी भवन’ असावे म्हणून गेल्या तीन-चार वर्षांपासून चर्चा आहे. त्यासाठी जागेची शोधमोहीम सुरू आहे. काही जागा ठरल्याही पण प्रत्यक्षात काहीच उतरले नाही. आजचे कार्यालय खूपच छोटे आहे.
अपडेट आहोत
भाजपकडे स्वत:च्या मालकीचे कार्यालय आहे. तेथे कायमस्वरूपी कर्मचारी वर्ग आहे. एक हॉलही आहे. अँटी चेंबर आहे. संगणक , इंटरनेट, फॅक्स आदी सुविधा आहेत. लायब्ररी नाही; पण पक्षाचे मुखपत्र आणि इतर साहित्य वाचायला ठेवले जाते. अशोक निंबर्गी, सरचिटणीस, भाजप
अद्ययावत सेवा
काँग्रेस भवनात अगोदरपासून व्हिडिओ कॉन्फरन्ससह सर्व सुविधा उपलब्ध आहे. मतदार याद्या संगणकात फिड आहेत. लायब्ररी नाही; पण साहित्याची उपलब्धता केली जाते. निवडणूकीसाठी काँग्रेस भवन हेच मध्यवर्ती कार्यालय आहे. बाळासाहेब शेळके, जिल्हाध्यक्ष काँग्रेस