आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Doctor, Prescription Drugs, Divya Marathi

डॉक्टर कॅपिटल अक्षरात लिहितील औषधांची नावे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - डॉक्टरांनी गिचमिड अक्षरात लिहून दिल्याने औषधांची नावे समजत नाहीत, अशी तक्रार करण्याची वेळ यापुढे रुग्णांवर येणार नाही. कारण कॅपिटल अक्षरांमध्ये औषधांची नावे लिहिण्याचे बंधन डॉक्टरांवर आले आहे. इतकेच नाही तर औषधांची जेनेरिक नावेही लिहिणे अत्यावश्यक बनले आहे. डॉक्टरांकडून देण्यात येणार्‍या चिठ्ठीसाठी (प्रिस्क्रिप्शन) अन्न व औषध प्रशासनाने नवी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. यासाठी फार्मसिस्ट आणि डॉक्टर्स संघटनांची मदत घेण्यात आली आहे. यामुळे मेडिकल दुकानदार किंवा डॉक्टरांना या नियमाविरोधात जाण्याची संधी राहिलेली नाही. या संघटनांच्या संकेतस्थळांवर लवकरच प्रमाणित स्वरूपातील अर्ज उपलब्ध होणार आहे.


मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गेल्या आठवड्यात मार्गदर्शक तत्त्वे जाहीर झाली. डॉक्टरांकडून देण्यात येणार्‍या औषधांचा गांभीर्याने वापर व्हावा, दुष्परिणाम रोखता यावे, योग्य व स्वस्त औषधे मिळण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मॉडेल मेडिसीन प्रिस्क्रिप्शन फॉरमॅट तयार केला आहे. यात डॉक्टर व रुग्णाची सखोल माहिती राहणार आहे. फॉरमॅटनुसार माहिती भरण्यासाठी संगणकाच्या वापरापासून दूर राहणार्‍या डॉक्टरांना त्याचा वापर करणे भाग पडेल़


प्रिस्क्रिप्शनचा फॉरमॅट
औषधांची माहिती अशी द्यावी लागणार : मेडिसीनचे नाव कॅपिटल अक्षरात असावे तसेच जेनेरिक औषध लिहावे, औषधांची क्षमता व माहिती, डोस (प्रमाण) किती घ्यावे, डोसबाबत प्रिस्क्रिप्शनमध्ये माहिती, औषधांचे प्रमाण व कालावधी, क्रमांक, वय व वजन या संदर्भातील तपशील

रुग्णाची माहिती आवश्यक : रुग्णाचे संपूर्ण नाव, स्त्री किंवा पुरुष याचा उल्लेख, रुग्णाचा पत्ता व संपर्क दूरध्वनी क्रमांक, वय व वजन या संदर्भातील तपशील

> डॉक्टरचा संपर्क क्र. व ई-मेल > दिनांक व अनुक्रमणिका क्रमांक

> डॉक्टरांचे संपूर्ण नाव > रजिस्ट्रेशन नंबर
> वैद्यकीय शिक्षणाचा तपशील > क्लिनिकचा पत्ता


होलसेल विक्रेत्यांकडून घेतलेल्या औषधांची बिले ठेवणे डॉक्टरांना बंधनकारक होते. आता डॉक्टरांनी दवाखान्यातून रुग्णांना दिलेल्या प्रत्येक गोळीचा हिशेब ठेवणे आवश्यक बनले आहे. महेश झगडे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन , पुणे


प्रिस्क्रिप्शन फॉरमॅट नुकताच जाहीर झाला. त्याच्या अंमलबजावणीसाठी डॉक्टर आणि प्रशासनामध्ये बैठका घेऊन माहिती देण्यात येत आहे. याची बर्‍यापैकी सुरुवात झाली आहे. सर्वत्र अंमलबजावणीचा प्रयत्न असेल. वीरेंद्र रवी, सहआयुक्त, औषध प्रशासन, सोलापूर


अन्न व औषध प्रशासनाने केलेला फॉरमॅट योग्य आहे. अंमलबजावणीसाठी डॉक्टर, रुग्ण आणि मेडिकल दुकानदार या सर्वांचीच जबाबदारी आहे. नियमाप्रमाणे 3 वर्षापर्यंत रेकार्ड ठेवणे बंधनकारक आहे. मनीष बलदवा, अध्यक्ष, केमिस्ट असोसिएशन