आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालये ‘बाटू’च्या दिशेने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित 15 अभियांत्रिकी महाविद्यालये लोणेरे (ता. माणगाव, जि. रायगड) डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठा (बाटू) सोबत संलग्नित होण्याच्या निर्णयाप्रत पोहोचत आहेत. मंगळवारी विद्यापीठात झालेल्या बैठकीत याचे संकेत मिळाले.


नवीन तंत्रशास्त्र विद्यापीठाची स्थापना करण्याची मागणी राज्यात सर्वत्र होती. त्या पार्श्वभूमीवर जानेवारीमध्ये मंत्रिमंडळाची बैठक झाली. तीत नवे विद्यापीठ न काढता लोणेरे येथील तंत्रशास्त्र विद्यापीठाला राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांनी संलग्नता घ्यावी असा पर्याय समोर आला. अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, वास्तुशास्त्र व व्यवस्थापनशास्त्र या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना आता तंत्रशिक्षण विद्यापीठाशी संलग्न व्हायचे अथवा आहे त्या विद्यापीठाशीच संलग्न असावे, याबाबतचा निर्णय घ्यावा लागणार आहे.


निर्णयस्वातंत्र्य ज्या त्या अभियांत्रिकी महाविद्यालयाकडेच असल्याने नवी उत्सुकता ताणली जात आहे. ही कोंडी फोडत तंत्रशिक्षण विद्यापीठाचे संलग्नत्व घेण्याचा निर्णय सोलापूर विद्यापीठातील सर्वच अभियांत्रिकी महाविद्यालये घेत आहेत. म्हणजेच पारंपरिक विद्यापीठाकडे असणारे संलग्नत्वासंदर्भातील एकाधिकार संपुष्टात येणार आहेत. आता राज्यातील सर्व विद्यापीठे आपल्याकडील पाच एकर जागा विभागीय कार्यालये व उपकेंद्र स्थापन करण्यासाठी देणार आहेत. यामुळे मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद येथे तंत्रशिक्षण विद्यापीठाची विभागीय कार्यालये उभारली जातील. तर कोल्हापूर, सोलापूर, अमरावती, नांदेड व जळगाव येथे उपकेंद्रे उभारली जातील. सोलापूर विद्यापीठाकडील 482 एकर जागेपैकी पाच एकर जागा उपक्रेंदासाठी उपलब्ध होणार आहे. दरम्यानच्या काळात कार्यालये कार्यान्वित करण्यासाठी तंत्रशिक्षण विद्यापीठाला 15 कोटींचा निधीही मंजूर झाला आहे.


‘तंत्रशिक्षण’कडे कल
जिल्ह्यातील 15 अभियांत्रिकी महाविद्यालये याबाबतचा निर्णय एकत्रितरित्या घेतील. यासाठी आवश्यक असणारी समन्वय बैठक, चर्चा सुरू आहे. सोलापूर विद्यापीठात याबाबतची बैठक मंगळवारी झाली. बहुतांश महाविद्यालयांचा कल लोणेरे तंत्रशिक्षण विद्यापीठाशी संलग्नत्व घेण्याकडे आहे. मात्र, अंतिम निर्णय अद्याप नाही. आम्ही सर्वजण मिळून पुन्हा चर्चा करणार आहोत. जो निर्णय होईल तो एकमताने होईल. प्रो. जी. के. देशमुख, अध्यक्ष, विद्या विकास प्रतिष्ठान अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर


सकारात्मक चर्चा झाली
विद्यापीठात आज बैठक झाली. मात्र, जोपर्यंत विद्यापीठाचा जीआर येत नाही, तोपर्यंत अंतिम निर्णय घेता येणार नाही. संलग्नित होण्याचा निर्णय संस्था चालकांकडे आहे. प्राचार्यांचे मत त्यांच्यापेक्षा वेगळे असू शकत नाही. तंत्रशिक्षण विद्यापीठाशी संलग्नित होण्याबाबत सकारात्मक व सर्वंकष चर्चा या बैठकीद्वारे झाली, एवढे आपण म्हणू शकतो. डॉ. शशिकांत हलकुडे, वालचंद अभियांत्रिकी, सोलापूर


एकमताने निर्णय होण्याची शक्यता
लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाला संलग्नित होण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली एवढे मी सांगू शकेन. जिल्ह्यातील सर्वच अभियांत्रिकी महाविद्यालये याबाबत जो निर्णय घेतील तो एकमताने घेण्याची अपेक्षा आहे. डॉ. बी. पी. रोंगे, प्राचार्य, इंजिनिअरिंग कॉलेज, गोपाळपूर