आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - वेळ दुपारची. स्थळ -भारती विद्यापीठ. हातातल्या कुंचल्याच्या साहाय्याने विद्यार्थी-विद्यार्थिनी रंग तर शिंपडत होतेच. शिवाय, त्या रंगांतून पर्यावरण रक्षणाचा संदेशही देत होते. चेहर्यावर अलगद हाताने फिरणारा कुंचला पर्यावरण महत्त्वाची जाणीव करत, त्याचे संगोपन जर नीट झाले नाही तर येत्या काळात मनुष्याला कोणत्या परिस्थतीला तोंड द्यावे लागेल याची बोचरी जाणीव करून देत होता. निमित्त होते फेस पेंटिंग स्पर्धेचे.
गुरुवारी भारती विद्यापीठ येथे आंतर महाविद्यालयीन ‘लक्ष्य’ या स्पध्रेचे उद्घाटन झाले. या स्पर्धेत फेस पेंटिंग स्पर्धा झाली. या वेळी विद्यार्थ्यांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. फेस पेंटिंगमध्ये 10 महाविद्यालयांच्या 10 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सहभागी विद्यार्थ्यांना स्पर्धा सुरू होण्यापूर्वी 15 मिनिटे अगोदर सेव्ह नेचर ही थिम सांगण्यात आली. त्यानंतर त्यांना एक तासाचा कालावधी देण्यात आला. या वेळेत त्यांनी पर्यावरणावर भाष्य करणारी पेंटिंग आपल्या सोबतीला असलेल्या व्यक्तीच्या चेहर्यावर काढली. पाण्याशिवाय ओसाड बनणारी पृथ्वी, झाडे वाचवा हा संदेश, निसर्गात वाघ नसेल तर पृथ्वी कशी अडचणीत येईल हे पेंटिंगचे विषय होते. वॉटर कलरच्या साहाय्याने आणि आपल्या कल्पकतेच्या जोरावर त्यांनी पर्यावरणाच्या रक्षणाचे विविध पैलू मांडले. या वेळी डॉ. अविनाश ढवन, शिवगंगा मैंदर्गीकर आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी जॉन रोमन यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
स्पर्धांच्या आयोजनाचे दहावे वर्ष
भारती विद्यापीठाकडून अशा प्रकारच्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धांच्या आयोजनाचे हे दहावे वर्ष आहे. गुरुवारी याचे उद्घाटन लिंगे उद्योग समूहाचे चेअरमन शंकरराव लिंगे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर प्रीतम कोठारी, डॉ. ए.बी. नदाफ, विक्रांत शिंदे, एस.एन. देशमुख आदी उपस्थित होते. लक्ष्य स्पध्रेत डान्स, सिंगिंग, फेस पेंटिंग, वक्तृत्व स्पर्धा आदी स्पर्धा पार पडल्या. यात 18 कॉलेजच्या एकूण 134 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.