आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Lok Sabha Election, Money, Divya Marathi

सोलापूर शहर, जिल्ह्यात पैशांपाठोपाठ दारूचा महापूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर आणि जिल्ह्यात लाखो रुपयांची रोकड सापडत असतानाच मंगळवारी 10 लाख 31 हजार रुपयांची विदेशी दारू पोलिसांनी जप्त केली. अक्कलकोट रस्त्यावरील अरफात नगरात ही कारवाई झाली. ‘ओल्डमंक’ कंपनीच्या उंची रमच्या 8 हजार 880 बाटल्या या कारवाईतून मिळाल्या. शिवाय 760 लिटर हातभट्टी दारूही सापडली. मतदानाला आता फक्त 8 दिवस राहिले. मतदारांना प्रलोभने देण्यासाठी अशी कृत्ये केली जात असल्याचा अंदाज आहे.


एमआयडीसी पोलिस ठाण्यात यासंबंधीचा गुन्हा दाखल झाला. त्यानुसार बालाजी बाळासाहेब घोडके (वय 28), कय्युम इमाम सय्यद (वय 32, दोघेही राहणार ढोकी, उस्मानाबाद) आणि पिंट्या धनपत चव्हाण (वय 21, रा. मुळेगाव तांडा) अशा तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 10 लाख 31 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही दारू कुठे नेण्यात येणार होती किंवा कोणी मागवली होती, याबाबत पोलिस चौकशी करत आहेत.


शहर आणि जिल्ह्यात रोख रकमा सापडण्याचे प्रकार वाढले. 2 ते 7 एप्रिल या सहा दिवसांत 1 कोटी 32 लाख रुपये मिळाले. पंढरपूर आणि मंगळवेढय़ात सोमवारी 35 लाख रुपये मिळाले. त्याची चौकशी सुरू झाली. पोलिस, आयकर खाते, निवडणूक यंत्रणा यांच्या समन्वयातून ही कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते अस्वस्थ झाले. नेत्यांच्या बैठकीतून याबाबत बोलूनही दाखवत आहेत.


मुद्देमालाचे काय होते?
कुणाकडे रक्कम सापडली, त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे. पैशाचा तपशील सांगणारी कागदपत्रे तपासली जातात. संशय आल्यास आयकर खात्याच्या अधिकार्‍यांना बोलावले जाते. चौकशी होईपर्यंत ही रक्कम कोशागार कार्यालयात ठेवण्यात येते. वेळापुरातील 80 लाख रुपये एटीएम यंत्रांमध्ये भरण्यासाठी घेऊन जाण्यात येत होती, ही बाब पटल्याने ती रक्कम संबंधित एजन्सीकडे परत देण्यात आली. उर्वरित रकमांची चौकशी सुरू आहे.


नेत्याची नेत्याकडे कैफियत
वाटपासाठी निवडणुकीत सक्रिय असणार्‍या एका नेत्याने सोमवारी मोठय़ा नेत्याकडे तक्रार केली. ‘पैसे, कपडे पकडले गेले. काय करायचे साहेब?’ असे सांगताना साहेबांच्या समोरील माइकमधून त्यांचा आवाज घुमला. त्यामुळे साहेबही एकदम सावध झाले. ‘चला, नंतर नंतर’ म्हणत त्यांनी विषय बदलून टाकला.