आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Lok Sabha Election Propaganda, Divya Marathi

सेलिब्रिटी, दिग्गजांच्या आता रंगणार प्रचारसभा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला हळूहळू रंग चढू लागला आहे. उन्हाचा पारा जसा वाढू लागला आहे, तसे राजकीय वातावरणही तापायला सुरुवात झाली आहे. त्यात भर पडणार आहे ती विविध राजकीय पक्षांच्या ‘सेलिब्रिटी’ प्रचारकांच्या सभांची. हे सेलिब्रिटी कोण असावेत, हे ठरवण्यासाठी कोणाला मतदारसंघातील जातीय समीकरण, कोणाला मुद्दे तर कोणाला मतदारांना आकर्षित करणारी ताकद असलेल्या व्यक्ती या बाबींना प्राधान्य दिले जात असल्याचे समोर येऊ लागले आहे.
काँग्रेससाठी जितेंद्र, चिरंजीवी, अझरुद्दीन यांच्या सभा
सोलापूर तसा बहुभाषिक व बहुजातीय समीकरण असलेला मतदारसंघ आहे, तर माढा हा ग्रामीण परिसर असलेला शेतकर्‍यांचा व साखरसम्राटांचा परिसर आहे. सोलापुरातून केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे निवडणूक लढवत असले तरी त्यांनाही सोलापुरातील मतदार आकर्षित करण्यासाठी नेते, अभिनेत्यांच्या सभांची, ‘रोड शो’ यांची आखणी करावी लागत आहे. राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांची शेवटच्या टप्प्यात सोलापुरात सभा अपेक्षित आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, अभिनेते जितेंद्र, चिरंजीवी, क्रिकेटपटू अझरुद्दीन यांच्यासह राज्यातील अनेक मंत्र्यांच्या सभा होणार आहेत. उमेदवार शिंदे यांना काँग्रेसने पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान दिले आहे. त्यामुळे त्यांनाही अनेक मतदारसंघांत जावे लागणार आहे.
हेमामालिनी, सिद्धू, स्वराज येण्याची चिन्हे
सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, व्यंकय्या नायडू, सुषमा स्वराज, हेमामालिनी, मुक्तार अब्बास नक्वी, शहानवाज हुसेन, क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू, नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या नावांची यादी तयार केली गेली आहे. यापैकी कोण कोण सोलापुरात येते यावरच येथील निवडणुकीचे वातावरण तापणार आहे.
मुश्रीफ, सुळे यांच्या सभा, मोदींसाठी भाजपचे प्रयत्न
माढय़ातील राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह मोहिते यांना प्रचारासाठी शरद पवार यांचीच जास्त गरज आहे. राजू शेट्टी यांना रोखण्यासठी हसन मुश्रीफ, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष भास्कर थोरात, सुप्रिया सुळे आदी नेत्यांना आणण्याची त्यांची तयारी आहे. तर त्यांच्याशी स्पर्धा करणारे महायुतीचे उमेदवार सदाभाऊ खोत यांच्यासाठी भाजपचे गोपीनाथ मुंडे, राजू शेट्टी यांनी येण्याचा शब्द दिलेला आहे. सोलापूर किंवा माढय़ात नरेंद्र मोदी यांची सभा व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
पाटकर, नंदू माधव, दमानिया येणार
आम आदमी पार्टीच्या प्रचारासाठी सामाजिक कार्यकर्त्या व मुंबईतील उमेदवार मेधा पाटकर, नाट्य कलावंत नंदू माधव, अंजली दमानिया यांच्या सभा सोलापूर व माढय़ात होतील. शेवटच्या टप्प्यात पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची दोन्ही मतदारसंघासाठीची संयु्क्त जाहीर सभा घेण्याचे नियोजन सुरू आहे. शिवाय ‘सोशल मीडिया’ ही आम आदमी पार्टीसाठी सर्वात महत्त्वाची ‘सेलिब्रिटी’ ठरणार आहे.