आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Lok Sabha Election, Sushilkumar Shinde,divya Marathi

नारळ फुटला, प्रचार पेटला;पवार, चव्हाणांच्या साक्षीने शिंदे, मोहितेंचे अर्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते यांनी अनुक्रमे सोलापूर व माढा मतदारसंघासाठी मंगळवारी उमेदवारी दाखल केली. कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, सतेज पाटील, आमदार भारत भालके, बबनराव शिंदे, दीपक साळुंखे, दिलीप माने, गणपतराव देशमुख, सुधाकर परिचारक, विष्णूपंत कोठे, माजी आमदार राजन पाटील उपस्थित होते. विशेष म्हणजे विजयसिंह मोहिते यांचा उमेदवारी अर्ज कृषिमंत्री शरद पवार यांनी आणला होता.


निवडणूक निर्णय अधिकारी भोसले वादात
माढा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भोसले यांनी अपक्ष, महायुती, बसप उमेदवारांचे अर्ज खुर्चीवर बसून स्वीकारले. मात्र मंगळवारी विजयसिंह मोहिते यांचा अर्ज उभा राहून स्वीकारला. या वेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, गणपतराव देशमुखही हजर होते.

निवडणूक अधिकारी भोसले यांच्या अर्ज स्वीकारण्याच्या ‘पद्धतीवर’ महायुतीचे उमेदवार सदाभाऊ खोत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. आचारसंहिता सर्वसामान्यांसाठी असते आणि त्यांनीच ती पाळायची असते. धनदांडगे आणि अधिकार्‍यांनी काहीही केले, ते कसेही वागले तरी कारवाई होत नाही. कारण सत्ता त्यांच्याच हातात असते. आचारसंहितेच्या नावाखाली सरकार राज्यकर्त्यांसाठी वेगळा आणि इतरांसाठी वेगळा नियम लावत आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे दाद मागू, असे ते म्हणाले.

सोलापूर आणि माढा मतदारसंघात मंगळवारी 16 उमेदवारांनी 27 अर्ज दाखल केले. सोलापूर मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदे यांच्यासह 8 उमेदवारांनी 11 उमेदवारी अर्ज भरले. शिंदे यांनी तीन, भाजपच्या शरदकुमार बनसोडे यांनी 1, अपक्ष दत्तात्रय विठ्ठल थोरात यांनी 2 तर सोमनाथ शिवाजी घोडकुंभे, शिवाजी महादेव होनकळस, कृष्णा नागनाथ भिसे, प्रमोद रामचंद्र गायकवाड, नीलम श्रीमंत भंडारे यांनी प्रत्येकी 1 उमेदवारी अर्ज दाखल केला. माढा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते यांच्यासह 8 उमेदवारांनी 16 अर्ज दाखल केले. तृणमूल काँग्रेसचे सुरेश श्यामराव घाडगे, अपक्ष बळीराम सुखदेव मोरे, नागमणी किसन जक्कन, प्रफुल्ल कदम, सुभाष बाळासाहेब पाटील, गणपत परमेश्वर भोसले, डॉ. प्रमोद रामचंद्र गावडे यांनीही अर्ज दाखल केले.


357 अर्जांची विक्री
सोलापूर आणि माढा मतदारसंघातील दोन जागांसाठी मंगळवारपर्यंत 357 उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. यामध्ये माढा मतदारसंघात 166 तर सोलापूर मतदारसंघात 191 अर्जांचा समावेश आहे. मंगळवारी सोलापूर मतदारसंघातून 4 जणांनी 9 तर माढा मतदारसंघातून 4 जणांनी 10 अर्ज नेले आहेत.

शिंदे, मोहिते यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11.45 वाजता आगमन
शिंदे सोलापूर तर मोहिते माढा निवडणूक कार्यालयाकडे मार्गस्थ.
कृषिमंत्री शरद पवार 11.55 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल.
खुद्द शरद पवारांनीच विजयसिंह मोहितेंचा उमेदवारी अर्ज आणला
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील यांचे 12.20 वाजता आगमन.
मोहितेंचा अर्ज छाननीस देऊन पवार 12.05 वाजता शिंदेंचा अर्ज भरण्यासाठी मार्गस्थ.
सुशीलकुमार शिंदे यांचा 12.25 वाजता सोलापूरसाठी उमेदवारी अर्ज दाखल.
शिंदेंचा अर्ज दाखल होताच 12.30 वाजता लवाजमा मोहितेंचा अर्ज भरण्यासाठी रवाना
पवार, चव्हाणांच्या साक्षीने 12.40 वाजता माढा लोकसभेसाठी मोहितेंची उमेदवारी दाखल.
सर्व नेते जाहीर सभेसाठी 12.55 वाजता रवाना