आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Lok Sabha Election, Third Frant, Divya Marathi

सोलापूरात तिसर्‍या आघाडीची शक्यता मावळली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महायुती, महाआघाडीला विरोध करणार्‍या डाव्यांनी सोलापूर लोकसभा निवडणुकीबाबत अद्याप कुठलीच भूमिका मांडली नाही. डाव्यांचे निमंत्रक आणि माकपच्या केंद्रीय समितीचे सदस्य नरसय्या आडम यांनी 28 मार्चला सारे काही स्पष्ट करू, असे सांगितले. तोपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यामुळे सोलापुरात तिसर्‍या आघाडीची शक्यता मावळली आहे. पण डावे करणार काय, ही उत्सुकता मात्र आहे.


धर्मनिरपेक्षतेच्या मुद्दय़ावर डाव्यांनी सातत्याने काँग्रेसची पाठराखण केली. परंतु अणुकरारावरून त्यांच्यात तीव्र मतभेद झाले. त्याच वेळी कुठल्याही स्थितीत काँग्रेसला साथ द्यायची नाही, हेही ठरवून टाकले. भाजप-शिवसेना तर डाव्यांच्या दृष्टीने जातीयवादी पक्ष. अशा स्थितीत समविचारी पक्षांना घेऊन तिसरा पर्याय देण्याचे डाव्यांचे प्रयत्न असतात. यंदा ही मोट बांधण्यात यश आले नाही.


सोलापुरात स्थानिक स्तरावर डाव्यांची भूमिका ठरत असते. त्यालाही विलंब होत असल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत डाव्यांनी आतताईपणा केला. त्यामुळे निवडणूक निकालात तोंडघशी पडले होते. त्यामुळे सावध पावले उचलण्यात येत आहे.


मास्तर म्हणतात, आता बोलणार नाही!
थेट - भेट
प्रश्न : डाव्यांच्या भूमिकेकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.
आडम : आमची भूमिका अद्याप ठरलेली नाही. नेत्या-कार्यकर्त्यांसमवेत बैठका सुरू आहेत.
प्रश्न : सोलापूर लोकसभा मतदारसंघापुरते तरी काही ठरवले असणार ना?
आडम : नाही. 27 मार्चला आमची अंतिम बैठक होईल. त्यानंतर 28 ला भूमिका जाहीर करू.
प्रश्न : तोपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया संपून जाईल.
आडम : जी काही चर्चा सुरू आहे, त्याबाबत आताच काही बोलणार नाही.


अशी झाली डाव्यांची गोची
* गेल्या लोकसभा निवडणुकीत डावे बहुजन समाज पक्षाला मिळाले होते. यंदा मात्र बसपचा हत्ती स्वत:च्या बळावरच चालू लागला. नुसती मते नाहीत तर नोटही मागू लागला.
*गेल्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन डावी लोकशाही समिती (रिडालोस)च्या फॉर्म्युल्यात मोठा पक्ष असणारा आठवले गटाचा रिपब्लिकन पक्ष महायुतीत सहभागी झाला.
*बसप, रिपब्लिकनने विचारणा केली नाही म्हणून डाव्यांनी आम आदमी पक्षाकडे लक्ष वेधले होते. पण देशातील केजरीवाल पुराणाची दिशाच स्पष्ट होत नसल्याने डावे थांबले.
*शेतकर्‍यांचा स्वाभिमान घेऊन फिरणारे राजू शेट्टी महायुतीत गेले. हेही डाव्यांना अनपेक्षित होते. हा पक्षही गेल्याने डाव्यांपुढे समविचारी पक्षच संपुष्टात आले.
* संयुक्त आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे अस्तित्व सोलापुरात नावापुरतेच आहे. त्याचे नेते आणि कार्यकर्ते सक्रिय नाहीत. भाकपही अशाच स्थितीत असल्याने माकप एकटा पडला.
* बोटांवर मोजण्याइतके समाजवादी पक्षाचे नेते ‘सायकल’ घेऊन डाव्यांकडे यायचे; त्यांचाही प्रभाव आता संपला. हैदराबादच्या ‘एमआयएम’नेही सोलापूरकडे पाठ फिरवली.