आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाशिवरात्र विशेष: महादेवाच्या स्पर्शाने पावन सोन्नलगी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - देवांचे देव महादेव म्हणजेच श्री मल्लिकार्जुन. मल्लय्या हे भक्तांनी त्यांना दिलेले लाडके नाव. बाल सिद्धरामाच्या भक्तीची कीर्ती आणि थोरवी ऐकून मल्लय्याला सोन्नलगी (सोलापूर) ला यावे लागले. बाराव्या शतकात भोळ्या शंकराने बाल सिद्धरामाला जंगमाच्या रूपात दर्शन दिले. सध्या जिल्हा परिषदेजवळ असलेले श्री गुरुभेट देवस्थान म्हणजेच मल्लय्याने भक्त सिद्धरामाला भेटलेले स्थान होय. याच ठिकाणी बसून शिवशंकराने सिद्धरामाच्या हातचा हुरडा खाल्ला होता. भगवान शिवाची उपासना करण्याचा आज सर्वात महत्त्वाचा सण - महाशिवरात्री. त्यानिमित्ताने शिवयोगी सिद्धरामांच्या गुरूंचे (महादेव) श्री गुरूभेट येथे दर्शन घेणे आध्यात्मिक अनुभूती ठरते.


अशी आहे आख्यायिका
सिद्धराम बालवयात बोलत नव्हते. त्यामुळे आई-वडिलांना त्याची चिंता होती. त्यांची आजच्या जिल्हा परिषद असलेल्या परिसरात वडिलोपार्जित शेती होती. तो आपल्या सवंगड्यांसह गायी-गुरे घेऊन चारायला तेथे जात असे. सिद्धरामाला बालपणापासूनच शिवभक्तीची ओढ होती. एके दिवशी अचानक एक जंगम तेथे आला. त्याने माझे नाव मल्लय्या असल्याचे सांगितले. जंगमाने सिद्धरामांना हुरडा मागितला. सिद्धरामाने आगटी पेटवून हुरडा भाजून दिला. हुरडा खाल्ल्यानंतर जंगम म्हणाला, ‘हुरडा खाल्ल्याने माझ्या पोटात आग पडली आहे, तो दाह शमवण्यासाठी आता घरातून दहीभात घेऊन ये. दहीभात आणण्यासाठी सिद्धराम घरी गेला. त्याने प्रथमच आईला हाक मारली आणि जंगमासाठी दहीभात मागितले. मुलगा बोलल्याचा सिद्धरामच्या आईला खूपच आनंद झाला. दहीभात घेऊन सिद्धराम शेतात आला. मात्र, जंगम अंतर्धान पावला होता. त्यानंतर सिद्धराम मल्लय्याच्या ओढीने श्रीशैल येथे गेला. त्याने तेथे त्यांचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. मल्लय्याच्या दर्शनाच्या ओढीने व्याकुळ झालेल्या सिद्धरामाने कमरीकोळ्ळ (डोंगराचा कडा) वरून दरीत उडी मारली. त्याच्या अनन्य भक्तीपोटी मल्लय्या प्रकटला आणि त्याला धरले, अशी ही आख्यायिका आहे. श्रीशैलवरून परतल्यानंतर श्री सिद्धरामेश्वरांनी आध्यात्मिक व सामाजिक कार्य केले. तसेच गावात विविध ठिकाणी 68 लिंगांची स्थापना केली. ज्या ठिकाणी त्यांना जंगमरूपात श्री मल्लय्याने दर्शन दिले त्या ठिकाणीही लिंगाची स्थापना केली. त्याचे ‘नवणेश्वरलिंग’ असे नामकरण केले. या लिंगाची नित्यनेमाने पूजा केली जाते. गड्डा यात्रेप्रसंगी या लिंगालाही तैलाभिषेक केला जातो.


नवणेश्वरलिंग नाव का दिले?
सिद्धरामाच्या शेतात राळ्याचे पीक होते. त्यांनी मल्लय्याला त्याचा हुरडा दिला. राळ्याला कन्नडमध्ये ‘नवणी’ म्हटले जाते. त्यामुळे सिद्धरामेश्वरांनी या लिंगाला नवणेश्वर हे नाव दिले.