आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Mallikarjun Kharge, Union Railway Ministry

गुलबर्गा रेल्वे विभाग झाल्यास न्यायालयात धाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - केंद्रीय रेल्वे मंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुलबर्गा रेल्वे विभाग निर्मितीचे संकेत दिले आहेत. दोन-चार दिवसांत याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. सोलापूर विभागाचे विभाजन करून नव्या विभागाची निर्मिती झाल्यास या विरोधात थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला जाणार असल्याचा मनोदय सोलापूर रेल्वे प्रवासी संघटना आणि रेल्वे सल्लागार समितीने ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केला आहे.


दोन दिवसांपूर्वी गुलबर्गा रेल्वे स्थानकावर झालेल्या कार्यक्रमात रेल्वे मंत्री खर्गे यांनी गुलबर्गा विभाग निर्मितीचे संकेत दिले होते. नव्या विभागाची निर्मिती करताना नागरिकांच्या काही हरकती असल्यास त्याचाही विचार केला जाईल असे ते म्हणाले होते. त्याचाच धागा पकडून रेल्वे प्रवासी संघटना व सल्लागार समितीचे सदस्यांनी नव्या विभागाबाबत हरकत नोंदवली आहे. प्रवासी संघटनेने तर या प्रकरणी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतल्याने सोलापूर विभागाचे विभाजन करून गुलबर्गा रेल्वे विभागनिर्मिती निर्णयावर वाद पेटण्याची चिन्हे आहेत.


रेल्वेमधील दोन विभागांत किमान 250 किमीचे आंतर असावे असा रेल्वे बोर्डाचा नियम आहे.परंतु गुलबर्गा विभागाची निर्मिती करताना या मार्गदर्शकतत्त्वांना तिलांजली देण्यात आली आहे. सोलापूर व गुलबर्गा दरम्यानचे आंतर अवघे 110 किमी आहे. इतके जवळ आंतर असतानाही रेल्वे मंत्री खर्गे आपले राज्य आणि मतदारसंघाच्या राजकीय फायद्यासाठी गुलबग्र्याला स्वतंत्र रेल्वे विभाग बनवित आहेत, असा आरोप केला जात आहे.
गुलबर्गा विभाग झाल्यास सोलापूर विभागाचे आर्थिक उत्पन्न कमी होऊन प्रवाशांच्या सोयी-सुविधांवर याचा परिणाम होईल. या निर्णयाच्या विरोधात हरकत घेतली जाणार आहे. ’’ राजा जाधव, अध्यक्ष. सोलापूर रेल्वे प्रवासी संघ.


गुलबर्गा विभागाच्या निर्मितीस यापूर्वीच हरकत घेतली आहे. सोलापूर विभागाचे विभाजन होऊ नये म्हणून लोकप्रतिनिधींनीही प्रयत्न करणे गरजेचे आहे. सोलापूरकरांनी आता रेल्वे मंत्र्यांचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे.’’ केतन शहा, विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य.


गुलबर्गा विभागास विरोध कायम राहणार आहे. यापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची दिल्लीत भेट घेऊन गुलबर्गा विभागाच्या निर्मितीस विरोध दर्शविला होता. आताही हरकत घेणार आहोत.’’ प्रकाश वाले, मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य