आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, National Science Day, Solapur City

विज्ञान दिन विशेष: विज्ञान प्रकल्पांविषयी लोकप्रतिनिधी, प्रशासनात आहे घोर उदासीनता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा आणि वाढावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज असते. विज्ञानासंबंधीचे नवनवे प्रकल्प शहर आणि परिसरात उभे राहण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या दोन्ही स्तरावर संवेदनशीलता जपणे आवश्यक असते. परंतु दुर्दैवाने सोलापुरात या दोन्ही स्तरावर असंवेदनशीलता असल्याचे आजच्या विज्ञान दिनी नमूद करावे लागत आहे.


धर्मवीर संभाजी तलावजवळ स्मृती उद्यानात अवकाशप्रेमींना गृह, तारे आदींचे निरीक्षण करता यावे यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून अत्याधुनिक आणि उच्च क्षमतेची दुर्बिण बसवली. याला आज दोन वर्षे होत आली, परंतु हे केंद्र केवळ तंत्रज्ञ नसल्याचे कारण देत बंद ठेवण्यात आले आहे. माजी राष्टÑपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते मार्च 2012 मध्ये त्याचे उद्घाटन झाले होते.
उद्घाटन झाल्यानंतर काही दिवसच अवकाश निरीक्षणाची सोय होती. त्यानंतर आजपर्यंत ते केंद्र बंद आहे. त्याचा सामान्य नागरिकांना उपयोग झालाच नाही. आजही या निरीक्षण गृहाच्या बाहेर प्रवेश शुल्काची पाटी लावण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र ती बंद आहे.


प्रशासनाचे सोईस्कर दुर्लक्ष
तज्ज्ञ आॅपरेटर नसल्याने दुर्बिण बंद आहे. बाहेरील तज्ज्ञ व्यक्ती मोफत काम करण्यास येत नाही, अशी बालिश तक्रार करण्यात येत आहे. मानधन देऊन खात्यांर्तगत एक तंत्रज्ञ नेमला तर त्याने नागरिकांना अवकाश निरिक्षणाचे व खात्यास निरिक्षणाचे शुल्क मिळण्याचे दुहेरी फायदे होतील. मात्र, वर्षभरात एकही प्रस्ताव देण्यात आला नाही. ठरवीक सरकारी पठडीतील उत्तरे अधिकारी देतात. हे केंद्र सुरू व्हावे, लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा याची ना लोकप्रतिनिधींना तळमळ ना प्रशासकीय अधिका-यांना.


पुढील निधी मिळण्याची प्रतीक्षा
अवकाश निरीक्षण केंद्राचे उद्घाटन झाले. पण, त्यासाठी अद्याप तंत्रज्ञ नाही. त्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. यापूर्वी मिळालेला निधी संपला असून जिल्हा नियोजन समितीकडून पुढील निधी मिळाल्यानंतर त्याबाबत हालचाली होतील. वरिष्ठ पातळवर त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे.
अशोक पाटील, उपसंचालक, सामाजिक वनीकरण विभाग