आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळी पावसामुळे रब्बीची रास, द्राक्ष बागा जमीनदोस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण सोलापूर - होटगी व आहेरवाडी भागातील द्राक्षांचे गारपीठीने मोठे नुकसान झाले असून, ऊस, ज्वारी व गहू पिकांनाही मोठा फटका बसला आहे. विशेष म्हणजे तिर्‍हे येथील सिद्धनाथ साखर कारखान्याच्या गोदामाचे पत्रे उडाल्याने 1 लाख पोती साखर भिजली. यामुळे सुमारे 25 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती, कार्यकारी संचालक संजय जाधव यांनी दिली.


हत्तूर-वडकबाळ दरम्यान विजापूर महार्मगावर पाच झाडे कोसळ्यामुळे एकेरी वाहतूक सुरू होती. होटगी, आहेरवाडी, कुंभारी, वळसंग भागाला अवकाळी पावसाचा तडाखा बसला. माजी उपसभापती हरिष पाटील यांची 7 एकर द्राक्ष बागेतील घड फुटून जमिनीवर पडले. सुमारे 150 टन द्राक्षांचे नुकसान झाल्याची माहिती, श्री. पाटील यांनी दिली. शांतप्पा बिराजदार आमसिद्ध काळे, अप्पा माळी यांच्या बागेला फटका बसला. तिल्हेहाळ, बोरूळ, यत्नाळ, बंकलगी, आहेरवाडी, कासेगाव, उळे, कुंभारी, वळसंग, आचेगाव, कंदलगाव, मंद्रूप, निंबर्गी, कुसूर, विंचूर, भंडारकवठे भागातही पावसाचा फटका बसला. कणबस येथे द्राक्ष बाग उद्ध्वस्त : कणबस (गं) येथील सुरेखा नागनाथ चिवडशेट्टी यांच्या शेतातील अडीच एकर क्षेत्रावरील द्राक्ष बागेच्या तारा तुटल्या. त्यामुळे संपूर्ण बाग जमिनीवर कोसळली. अडीच एकर बागेतून चिवडशेट्टी यांना आठ टन बेदाण्याचे उत्पन्न अपेक्षित होते.


आंब्यासह गव्हाचे नुकसान
पंढरपूर परिसरात बुधवारी (दि. 26) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक अवकाळी पाऊस झाला. या पावसात गारा पडत होत्या. गारांच्या पावसामुळे आंबा, गहू तसेच द्राक्ष आदी पिकांचे नुकसान झाल्याचे शेतकरी वर्गातून सांगण्यात येते. पंढरपूर परिसरातील भाळवणी, उपरी, सुपली, पळशी, भंडीशेगाव, गुरसाळे आदी गावांमध्ये दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पावसास सुरुवात झाली.


तोंडावर आलेल्या राशीला फटका
बार्शी शहरासह व तालुक्यात सर्वदूर विजांच्या कडकडाट व मेघगर्जनेसह झालेल्या अवकाळी पावसामुळे विविध पिकांना फटका बसून शेतकर्‍यांचे नुकसान झाले. कांद्याची काढणी, ज्वारी मळणीचेही काम सुरू आहे. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मेघगर्जनेसह व विजांच्या कडकडाटासह पावसास सुरुवात झाली तेव्हा शेतकर्‍यांची एकच धांदल उडाली. सुरुवातील शहर व परिसरात अक्षरश: गारांचा पाऊस झाला. द्राक्षबागा, मोहोरमध्ये असलेले आंबे यांनाही याचा तडाखा बसला. शहर व परिसरात सर्वत्रच हा पाऊस झाल्याचे वृत्त आहे. पावसामुळे द्राक्षांच्या घडामध्ये पाणी साठून द्राक्ष नुकसानीची शक्यता आहे. शहर व तालुक्यातील वीटभट्टी उत्पादकांना याचा फटका बसला आहे.


सांगोला तालुक्यात हलक्या सरी
सांगोला शहरासह ग्रामीण भागात आज सायंकाळी 6.30 च्या दरम्यान पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सर्वत्र पाऊस पडल्यामुळे मातीचा सुवास दरवळत होता. त्याचप्रमाणे गारवाही सुटला होता. ज्वारीला पाउस हानीकारक असल्याचे शेतकरीवर्गाने सांगितले.


पावसामुळे फळबागांना धोका
माढा तालुक्यामध्ये गारांच्या पावसामुळे फळ पिके व ज्वारीचे नुकसान होणार आहे. तालुक्यातील टेंभुर्णी येथे सायंकाळी पाच वाजता वादळासह वीस मिनिटे गारांचा पाऊस पडला. शेतकर्‍यांनी शेतामध्ये ज्वारीचे पीक काढून ठेवले आहे. त्यामुळे मोठय़ा नुकसानीची भीती आहे. कुर्डुवाडीसह माढा, रोपळे क., कव्हे, रिधोरे, लऊळ आदी भागांमध्ये वादळीवार्‍यासह पाऊस पडला.


ज्वारीच्या कोठाराचे नुकसान
मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात सुमारे अर्धा तास अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे ज्वारी, हरभरा, करडई, गहू, तसेच द्राक्षांच्या बागांचे नुकसान झाल्याचे शेतकरी हतबल झाला आहे. ब्रrापुरी, माचणूर, बेगमपूर, अर्धनारी या भागाला वादळी वार्‍याचा जोरात फटका बसला. मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात जोरात पावसाला प्रारंभ झाला. मळणी करत असलेल्या ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे धान्य भिजले. द्राक्षांच्या बागांनाही मोठा फटका बसला.


माळशिरसमध्ये साधारण पाऊस
माळशिरस तालुक्यात हलका व साधारण स्वरूपाचा पाऊस पडला असला तरी द्राक्षे व गहू या पिकांना त्याचा फटका बसणार आहे. बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अकलूज, माळीनगर, श्रीपूर, महाळुंग, निमगाव, पानीव, लवंग, संगम, शेवरे या ठिकाणी हा अवकाळी पाऊस पडला. श्रीपूर येथे थोड्याशा दमदार सरी पडल्या. अकलूज येथेही रस्ता धुवून जाईल एवढा पाऊस पडला. सायंकाळी 7 वाजेपर्यंत ढगाळ वातावरण होते. आजच्या पावसाने द्राक्ष व गव्हाला फटका बसला.