आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Prithiviraj Chavan, Chief Minister, Sharad Pawar

तापू लागले सोलापूरचे राजकारणही; मुख्यमंत्री चव्हाण, शरद पवारांची उद्या सभा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काँग्रेस भवनात नेत्यांची इतकी गर्दी झाली की, सुशीलकुमार शिंदे यांनाही दाटीवाटीने बसावे लागले. - Divya Marathi
काँग्रेस भवनात नेत्यांची इतकी गर्दी झाली की, सुशीलकुमार शिंदे यांनाही दाटीवाटीने बसावे लागले.

सोलापूर - सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे दोन दिवस राहिलेले असताना तापत चाललेल्या उन्हाबरोबरच राजकारणही तापू लागले आहे. आज काँग्रेसने राष्ट्रवादीला तर भाजपने अल्पसंख्याकांना सोबत घेण्यासाठी बैठका घेतल्या. तर बाबा रामदेव यांच्या पतंजली योगने भ्रष्टाचारमुक्त भारत घडवण्यासाठी निष्कलंक उमेदवाराला निवडून देण्याचा संदेश देण्यासाठी ‘योगा’चे आयोजन केले. आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते चौकाचौकात माहितीपत्रक वाटप करीत पक्षाची भूमिका मांडू लागले आहेत.


चव्हाण, पवारांची उपस्थिती
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे तर माढय़ातून राष्ट्रवादी तर्फे विजयसिंह मोहिते मंगळवारी उमेदवार दाखल करणार आहेत. त्यावेळी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह राज्यातील मंत्री उपस्थित राहणार आहेत. तसेच, एकत्रित जाहीर सभाही होणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी जिल्ह्यातील नेते, कार्यकर्ते मिरवणुकीने जिल्हाधिकारी कार्यालयात येणार आहेत. या वेळी होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांची तयारी सुरू आहे. सातही पोलिस ठाण्यांचे पोलिस कर्मचारी, राखीव पोलिस, कमांडो पथक, होमगार्ड, राखीव दलाची तुकडी यांची मदत घेण्यात येईल.


अशी झाली ‘चाय पे चर्चा’
‘आम्ही पहिल्यांदाच आलो. तीन तास झाले तरी चाय-पानी नाही’, असे चेष्टेने महेश गादेकर म्हणाले, त्यावर धर्मा भोसले यांनी ‘आज रविवार आहे सर्व कॅन्टीन बंद आहेत, आता महिनाभर तुमच्याकडेच चहा प्यावा लागेल’ असे उत्तर दिले. त्यावर कडी करीत ‘हो तेवढेच बघा’ असे प्रत्युत्तर गादेकरांनी दिले आणि तेथे हशा पिकला.

काँग्रेस, राष्ट्रवादीची एकत्रित बैठक
काँग्रेस- राष्ट्रवादीची एकत्रित बैठक रविवारी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित झाली. या बैठकीला आमदार दिलीप माने, प्रणिती शिंदे, माजी आमदार युन्नूसभाई शेख, प्रकाश यलगुलवार, महेश गादेकर, धर्मा भोसले, बाळासाहेब शेळके , धर्मण्णा सादूल, विश्वनाथ चाकोते आदी उपस्थित होते.

बनसोडे, खोत, बाबर आज अर्ज भरणार
महायुतीतर्फे सोलापुरातील उमेदवार अँड. शरद बनसोडे, माढय़ासाठी सदाभाऊ खोत हे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या वेळी खासदार राजू शेट्टी यांच्यासह काही नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. तर आम आदमी पार्टीतर्फे सोलापुरातून ललित बाबर हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

वाहतूक मार्गात केला बदल
शिवाजी पुतळा, चार पुतळा, डॉ. आंबेडकर पुतळा ते मार्केट यार्ड पोलिस चौकी आणि पूनम गेट या मार्गावरून उमेदवार अर्ज भरण्यासाठी मिरवणुकीने जाणार आहेत. त्यामुळे सोमवार आणि मंगळवारी तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक मार्गात बदल राहील. मिरवणूक पुढे गेल्यानंतर पुन्हा पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतूक सुरळीत करण्यात येणार आहे.


योग महोत्सवातून भ्रष्टाचार विरोधाचा दिला नारा
रामदेव बाबांना भारताला भ्रष्टाचारमुक्त बनवायचे आहे. येत्या लोकसभेच्या निवडणुकीत चांगल्या, निष्कलंक व भ्रष्टाचाराला विरोध करणार्‍या उमेदवारंना निवडून द्या, असे आवाहनही ब्रीजमोहन फोफलिया यांनी केले आहे. निमित्त होते शहिदांना र्शद्धांजली अर्पण करण्यासाठी रविवारी संपूर्ण देशभर झालेल्या भारत स्वाभिमान (न्यास)व पतंजली योग समितीच्या योग महोत्सवाचे. सोलापुरात रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास शिवस्मारक च्या प्रांगणात योग महोत्सव पार पडला. मनमोहन भुतडा यांनी आपले विचार मांडले. व्यासपीठावर अँड. विजय मराठे, प्राचार्च गजानन धरणे, प्राणिमित्र विलास शहा, अँड. राम देशपांडे, तेजा कुलकर्णी, सुधा अळ्ळीमोरे, अविनाश अळ्ळीमोरे आदी मान्यवर उपस्थित होते.