आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Proposal Of Separate Gulbarg Railway Division

अहवालानंतरच गुलबर्गा रेल्वे विभागाचे ठरणार भवितव्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - केंद्रीय रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुलबर्गा रेल्वे विभागाची घोषणा केली असली तरी विभाग प्रत्यक्षात येईल का, याबाबत साशंकता आहे. नवीन विभाग निर्मितीसाठी रेल्वे झोनकडून सादर करण्यात येणारा डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) रिपोर्ट याकरिता महत्त्वाचा आहे. एखाद्या सरव्यवस्थापकाकडून नकारात्मक रिपोर्ट असल्यास गुलबर्गा विभागाची निर्मिती रद्द होऊ शकते.


गुलबर्गा विभागाची निर्मिती सोलापूर, सिकंदराबाद आणि गुंटकल विभागातील भाग तोडून करण्यात येणार आहे. वरील तिन्ही विभाग अनुक्रमे मध्य रेल्वे , दक्षिण मध्य रेल्वे, व दक्षिण पश्चिम रेल्वे या तीन रेल्वे झोन अंतर्गत येतात. नव्या विभागासाठी आता या तिन्ही सरव्यवस्थापकांना डीपीआर रिपोर्ट सादर करावा लागणार आहे. या तिन्ही सरव्यवस्थापकांपैकी एकाने जरी नकारात्मक रिपोर्ट दिला तर गुलबर्गा विभाग निर्मितीस अडचण येऊ शकते. तसेच, हा रिपोर्ट सादर करण्यासाठी वेळेची र्मयादा न दिल्याने ही प्रक्रिया बरीच लांबण्याची शक्यता आहे.देशातील लोकसभेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत.


येत्या 3 अथवा 4 मार्चला निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केवळ तीन ते चार दिवसांत डीपीआर रिपोर्ट सादर होईल याची सूतराम शक्यता नाही. त्यामुळे रेल्वेमंत्र्यांनी केवळ आपल्या मतदार संघातील नागरिकांना भुलविण्यासाठी हा राजकीय स्टंट आहे असे दिसते; पण सोलापूर विभागाच्या विभाजनास विरोध होत आहे.


मध्य रेल्वेची भूमिका महत्त्वाची
दक्षिण मध्य आणि दक्षिण पश्चिम रेल्वे झोन दक्षिणेकडील असल्याने हे दोन्ही झोन गुलबर्गा विभागाच्या बाजूने असल्याची शक्यता आहे.त्यामुळे डीपीआर रिपोर्टमध्ये मध्य रेल्वेच्या सरव्यवस्थापकाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दोन्ही विभागाने सकारात्मक रिपोर्ट दिला आणि मध्य रेल्वेने जर नकारात्मक रिपोर्ट दिला तर गुलबर्गा विभागाची निर्मितीच अडचणीत येईल. त्यामुळे रेल्वे मंत्र्यांना आपल्या मागणीवर पाणी सोडावे लागेल. त्यासाठी सोलापुरातील प्रवासी संघटना, रेल्वे सल्लागार समिती आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून मध्य रेल्वेच्या सरव्यवस्थापकांवर दबाव आणण्याची गरज आहे. तेव्हाच सोलापूर विभागाचे विभाजन टळण्याची शक्यता आहे.

सरव्यवस्थापकांना भेटून तक्रार करणार
केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी राजकीय स्टंट म्हणून गुलबर्गा विभागाची घोषणा केली आहे. परंतु नव्या विभागासाठी झोनचा सकारात्मक रिपोर्ट महत्त्वाचा ठरतो. याबाबत मध्य रेल्वे सरव्यवस्थापकाची भेट घेणार आहे. तसेच डीपीआर रिपोर्ट नकारात्मक देण्याबाबत सांगितले जाईल. विभाग कसल्याही प्रकारे होऊ देणार नाही.’’ केतन शहा, सल्लागार समिती सदस्य

काय असेल डीपीआर रिपोर्टमध्ये
1. विभाग बनविण्याचे कारण काय. 2. विभागाची हद्द कुठेपर्यंत असावी. 3. विभाग बनताना काय सुविधा हव्यात. 4. विभागाची संघटनात्मक रचना कशी असावी. 5. यासाठी कर्मचारी कोठून आणायचे. 6. विभाग बनविताना किती खर्च येईल.याबाबतचा संपूर्ण तपशील द्यावा लागणार आहे.त्यानंतर नव्या विभागाला मान्यता मिळेल.