आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Rice, Cement, Governmental Godown, Divya Marathi

तांदळात कालवले जातेय सिमेंट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - रेल्वेमधून येणारे धान्य उतरवून घेतल्यानंतर ते शासकीय गोदामात न जाता रेल्वेस्थानकाच्या मालधक्क्यातच पडून राहिल्याने आणि धान्याच्या पोत्याशेजारीच सिमेंटची पोती ठेवली गेल्याने सरमिसळ होऊन तांदूळ वाया गेल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार गेल्या काही दिवसांपासून चालू आहे, पण त्याकडे रेल्वे प्रशासन, पुरवठा खाते आणि ठेकेदार या सगळ्यांचेच दुर्लक्ष होत आहे.


एकीकडे केंद्र सरकार अन्नसुरक्षा कायदा करून लोकांना स्वस्तात धान्य देऊ पाहात आहे तर दुसरीकडे त्यांचेच प्रशासन धान्याची नासाडी होत असताना बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे. रेल्वेने आलेली तांदळाची पोती सध्या मालधक्क्यात पडून आहेत. शेजारीच सिमेंटची पोती आहेत. तेथील स्लायडिंग खराब झाल्याने सिमेंट आणि तांदुळ यांची सरमिसळ होऊ लागली आहे. अवकाळी पावसाने सिमेंटची पोती भिजली. त्यातील काही सिमेंट वाहत जाऊन पोत्यातून खाली पडलेल्या तांदळात मिसळले. एका दिवसात 70 हजार पोते मालधक्क्यातून हलवणे शक्यच नाही, त्यामुळे ही परिस्थती उद्भवते असे हुंडेकर्‍यांच्या संघटनेचे म्हणणे आहे.


12 तासांचा नियम पाळला जात नाही
स्थानकाच्या पाठीमागे रामवाडी येथे रेल्वे प्रशासनाने गुड्स शेड (मालधक्का) बांधलेले आहे. याची साठवणूक क्षमता 12 हजार टनाची आहे. चार ते पाच दिवसांपूर्वी भारतीय खाद्य निगमचा एक रेक रामवाडी मालधक्का येथे उतरवण्यात आला. यामध्ये तांदुळ होता. आलेला माल 3600 टनाचा होता. नियमाप्रमाणे मालगाडीत माल चढवण्यासाठी 9 व उतरवण्यासाठी 12 तासांचा अवधी दिलेला असतो. त्या वेळेत जर माल चढवला अथवा उतरवला नाही तर रेल्वे प्रशासन संबंधितावर कारवाई करते. एका तासाला एका वॅगनसाठी 150 रुपयांचा दंड असतो. माल उतरवताना तेथे पोत्यातला माल पडणार याची जबाबदारी माल मागवणार्‍याची असते.


कारवाईचा इशारा
माल उतरवलानंतर तिथला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी संबंधितांची आहे. सध्या मालधक्क्यात एफसीआयचे तांदुळ आणि अल्ट्राटेक सिमेंट आहे. वेळेत माल उचलवणे अपेक्षित आहे. त्यांना दिलेली र्मयादी संपून गेली आहे. त्यामुळे प्रशासन येत्या एक ते दोन दिवसांत त्यांना आर्थिक दंडाची नोटीस देईल व कारवाई करेल. सुशील गायकवाड, वरिष्ठ व्यवस्थापक


.तर तपासणी करतो
रेशन दुकानांमध्ये धान्य आणून देईपर्यंत जी शासकीय यंत्रणा कार्यरत असते, ती अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे. सिमेंटमिर्शित धान्याबाबत जर कोणी आमच्याकडे तक्रार दिली तर त्याची तपासणी आमच्याकडून होईल आणि त्याचा अहवाल आम्ही संबंधित विभागाकडे पाठवून देतो. टी. सी. बोराळकर, साहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन


सुविधा मिळत नाहीत
रेल्वे प्रशासन आमच्याकडून दंड वसूल करते, पण त्या प्रमाणात सुविधा देत नाही. अनेक वर्षांपासूनची ही स्थिती आहे. आम्ही फक्त मालाच्या ट्रान्स्पोर्टपुरता विचार करतो. माल आणणारे आणि नेणारे यांनीच मिसळीबाबतची काळजी घेतली पाहिजे. 70 हजार पोती एका दिवसात हलवणे शक्यच नाही. त्यामुळे आम्ही दंड भरत असतो. बाबूराव घुगे, सचिव, हुंडेकरी असो.