आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Sharad Pawar, Narendra Modi, Prithiviraj Chavan

अध्यक्षीय पद्धत लादण्याचा भाजपचा डाव, पवारांची मोदींवर टीका; मुख्यमंत्रीही बरसले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - भारतात संघराज्य लोकशाही पद्धतीने कारभार चालतो. मात्र, भारतीय जनता पक्ष लोकशाहीची चौकट मोडून अध्यक्षीय पद्धत लादून देशाला हुकूमशाहीकडे घेऊन जाऊ पाहत आहे. महाराष्ट्राला मदत करणार्‍या गुजरातमधील कंपनीवर खटला भरून, महाराष्ट्राच्या विकासात खोडा घातला जात आहे. तेव्हा ते देशाचा काय कारभार करणार? असा प्रश्न केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी उपस्थित करून नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही मोदी लाट असल्याचा भाजप भास निर्माण करत असल्याची टीका केली.


केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते यांच्या प्रचारार्थ होम मैदानावर मंगळवारी जाहीर सभा झाली. प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते नारळ वाढवून प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर उमेदवारांसह सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, रामराजेनाईक निंबाळकर, शशिकांत शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, दिलीप माने, प्रभाकर घाडगे, भारत भालके , उज्‍जवला शिंदे, शामल बागल, माजी आमदार सुभाष चव्हाण, रणजितसिंह मोहिते, युन्नूस शेख, प्रकाश यलगुलवार, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते, वातट्रीकाकार रामदास फुटाणे, महापौर अलका राठोड, काँग्रेसचे शहराध्यक्ष धर्मा भोसले, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश गादेकर, जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे, माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, आनंदराव देवकते यांच्यासह माजी आमदार, प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर होते.


शरद पवार म्हणाले, ‘अमेरिकेत अध्यक्षीय पध्दतीने निवडणुका होतात, पण भारतात संघराज्य लोकशाही आहे. त्यामुळे निवडून आलेल्या खासदारांमधून पंतप्रधान निवडला जातो. ही घटनेची चौकट मोडण्याचा कूट डाव आहे. परवा वध्र्यात नरेंद्र मोदी आले होते. तेथे त्यांनी ‘चले जाव’चा नारा दिला. हा नारा कोणी कुठे दिला, हेच मोदींना माहिती नाही तर देशाला कोणती दिशा देणार?’ असा प्रश्न पवारांनी केला. महाराष्ट्राला ज्यांनी पशुखाद्य पुरवले त्यांच्याविरुद्ध नरेंद्र मोदींनी गुजरातेत फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. शेजारच्या राज्याला मदत करणार्‍याला ते अशी वागणूक देतात, ते हिंदुस्थानचा काय विकास करणार?. गुजरात दंगलीत ज्या मुस्लिम खासदाराला जाळून मारण्यात आले, ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथून जवळच गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे (मोदींचे) निवासस्थान आहे, पण मोदींना बाहेर येऊन या मुस्लिम कुटुंबाला भेटावेही वाटले नाही.’ या वेळी पवारांनी शिंदे आणि मोहिते हे गरिबांसाठी काम करत असल्याचे सांगून त्यांची स्तुती केली.


परदेशी कंपन्यांना हाताशी धरून आभास : मुख्यमंत्री चव्हाण
मोदींना कधीही आणि कुठेही आमने-सामने करण्याची तयारी आहे. मग कोणत्या राज्याचा किती विकास झाला हे दिसून येईल, असे आव्हान दिले. न्यूज चॅनेलचा उल्लेख टाळून मुख्यमंत्री चव्हाण यांनी परदेशी कंपन्यांना हाताशी धरून आपलीच सत्ता येणार असा आभास निर्माण केला जात आहे. केवळ मार्केटिंग केले जात आहे. मोदींच्या एकाधिकारशाहीने भाजपच घायाळ झाला आाहे. वरिष्ठ नेत्यांना त्यांनी बाजूला टाकले आहे. 2009 ची निवडणूक आघाडी करून लढवली. यंदा एकदिलाने मैदानात उतरलोत. आम्ही नुसतेच एकत्रित नाहीत तर मनोमिलन झाल्याचे सांगितले.

* पवार व चव्हाण यांनी काँग्रेस आघाडीचे मनोमिलन झाल्याचे दाखवण्याचा सोलापुरात प्रयत्न केला.
* सकाळी 11.30 वाजता होणारी सभा तब्बल एका तासाने सुरू झाली. कार्यकर्ते उन्हाचे चटके सोसत मैदानात थांबून होते.
* राम मंदिर बांधण्याची घोषणा प्रत्यक्षात उतरवता आली नाही, ते कसले मंदिर उभारणार. रामा कांबळेचा संसार उभारून खर्‍या रामाची पूजा केली पाहिजे, तेच काम काँग्रेस आघाडी करत असल्याचे लक्ष्मण ढोबळे यांनी सांगितले.
* सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या भाषणातून 2004 मध्ये शायनिंग इंडिया भास निर्माण करून भाजपने निवडणूक लढवली, त्यावेळी जे झाले तेच या वेळी होणार असल्याचे सांगितले.