आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Sinhagad Institute, District Court, V.V.Patil

‘सिंहगड’चा अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिंहगड इन्स्टिट्यूटच्या बेकायदा बांधकामाविषयीचा अर्ज जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी सोमवारी फेटाळल्याची माहिती महापालिकेचे विधी सल्लागार अँड. अरुण सोनटक्के यांनी दिली. मात्र, चार आठवड्यांसाठी ‘जैसे थे’चे आदेश देत उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी मुदत दिली आहे. मंडळाच्या केगाव (ता. उत्तर सोलापूर) परिसरातील बेकायदा बांधकाम पाडण्याविषयी महापालिका प्रशासनाने नोटीस दिली होती. नियोजित आराखड्यात रस्ता दाखवला, प्रत्यक्षात तेथे इमारत बांधली. बिगरशेती (एनए) मान्यता नसताना बांधकामप्रकरणी तसेच अन्य नियमांचे पालन केले नसल्याचे त्यात म्हटले होते. त्याच्या विरोधात मंडळाने न्यायालयात धाव घेतली होती. यापूर्वी न्यायदंडाधिकार्‍यांनीही मंडळाची याचिका फेटाळली होती.


महापालिका प्रशासनाने केलेल्या पाहणीत 13 इमारतींचे बांधकाम बेकायदा असल्याचे निष्पन्न झाले होते. त्याविषयी चार अधिकार्‍यांच्या समितीने अहवाल दिला होता. त्याआधारे महापालिका प्रशासनाने मंडळास 24 तासांत बांधकाम मागे घेण्याची नोटीस दिली. त्याच्या विरोधात मंडळाने उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाने न्यायदंडाधिकार्‍यांकडे दाद मागण्यास सांगितले. न्यायदंडाधिकारी सुधीर शिंदे यांनी याचिका फेटाळल्यानंतर मंडळाने जिल्हा न्यायालयात आव्हान दिले होते.


महापालिकेच्या वतीने अँड. एस. आर. पाटील यांनी तर सिंहगडच्या वतीने अँड. पी. डी. कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर सिंहगडची याचिका न्यायालयाने फेटाळली, अशी माहिती महापालिकेचे विधान सल्लागार अँड. अरुण सोनटक्के यांनी दिली.चार आठवडा बांधकाम ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यादरम्यान उच्च न्यायालयात धाव घेण्याची संधी सिंहगडला आहे. न्यायालयात धाव घेतल्यास त्यांच्या निर्णयानुसार महापालिका कार्यवाही करेल.


महापालिकेच्या पाहणीत
* 13 इमारतींच्या बाबतीत नियमांची पायमल्ली
* 25 इमारती बांधण्यास सशर्त परवानगी, प्रत्यक्षात 30 इमारतींचे बांधकाम
* 03 इमारतींना वापर परवाना, प्रत्यक्षात पाच पूर्ण इमारती आणि 13 अर्धवट इमारतीत विनापरवाना वापर