आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Solapur Lok Sabha Constituncy, Sushilkumar Shinde

भंडारकवठय़ात उधळला भंडारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण सोलापूर - सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे व भाजपचे उमेदवार अँड. शरद बनसोडे यांनी भंडारकवठे येथे श्री पीरमहासिद्धाच्या साक्षीने भंडारा उधळत तालुक्यातील प्रचाराचा शेवट केला. शिंदे यांनी नरेंद्र मोदींची हिटलरशाही मोडीत काढण्यासाठी केंद्रात सर्वधर्मसमभावाचे काँग्रेसचे सरकार सत्तेवर आणा, असे आवाहन केले. तर अँड. बनसोडे यांनी काँग्रेस सरकार व शिंदे यांच्यावर विकासकामावरून टीकास्त्र सोडले. मात्र, आता मतदारराजा कोणाच्या पारड्यात माप टाकणार, पाहावे लागेल.


मोदींच्या रूपाने हिटलरशाही
गृहमंत्री शिंदे म्हणाले, ‘देशात जातीयवादी शक्ती उफाळून आणणे, ही मोदींची भूमिका आहे. लालकृष्ण अडवाणी व जसवंतसिंह या ज्येष्ठ नेत्यांना दिलेल्या वागणुकीतून त्यांची हिटलरशाही दिसते. काँग्रेस हा सर्व धर्मांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. जातीयवादी शक्ती की काँग्रेससोबत जायचे याचा विचार करा. लोकसभेची निवडणूक राष्ट्रीय विचाराची असते. परंतु सोलापुरात येऊन स्थानिक प्रश्‍नावरून टीका करणे कितपत योग्य आहे. देशासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. दक्षिण सोलापूरने मुख्यमंत्री म्हणून निवडून दिले. आताही शेतकरी, तरुण व गोरगरिबांच्या हिताचे निर्णय घेणार्‍या काँग्रेसच्या पाठीशी उभे राहाल, याचा मला विश्वास आहे.’


राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य सुरेश हसापुरे यांनी शिंदे यांच्यासमोरच दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना धारेवर धरले. ‘काँग्रेसचे नेते मोठमोठी भाषणे करतात. परंतु मतदान जवळ आले तरी अजून सर्व शांतच आहेत. कार्यकर्ते आदेशाची वाटच पाहत आहेत. शिंदे यांच्यामुळे पदे भोगलेल्यांना तालुक्यातून मताधिक्य द्यावेच लागेल. तसे न झाल्यास त्यांना त्यांची जागा दाखवा,’ असे म्हणताच सर्वच नेते अवाक् झाले. या वेळी आनंदराव देवकते, बाळासाहेब शेळके, आमदार दिलीप माने, बसवराज बगले, गुरुनाथ म्हेत्रे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात प्रा. व्ही. के. पाटील यांनी भीमा नदीतील पाणी व विजेचा प्रश्‍न सोडवण्याची मागणी केली. कार्यकर्त्यांनी होटगी, वळसंग आदी गावांत पदयात्रा काढून प्रचाराची सांगता केली.


बनसोडे यांची पदयात्रा :भाजपचे उमेदवार अँड. बनसोडे यांनी मंगळवारी भंडारकवठे गावातून पदयात्रा काढली. यात किसान मोर्चाचे हणमंत कुलकर्णी, सरपंच अशोक मुक्काणे, यतीन शहा यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. नंतर सभेत त्यांनी भाजपला विजयी करण्याचे आवाहन केले. तसेच काँग्रेस व शिंदे यांनी विकास केला नसल्याची टीका केली. तालुक्यातील जनतेत बदल घडवण्याची भावना असल्याने नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. दुपारी माळकवठे, होटगी स्टेशन, बोरामणी भागातील काही गावांत भाजपच्या कार्यकर्त्यांनी पदयात्रा काढली.


दोन्ही पक्षांच्या मित्रपक्षाचे नेते, कार्यकर्ते प्रचारापासून दूर
मंद्रूप येथे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गुरुनाथ म्हेत्रे यांनी पदयात्रा काढली. मात्र, बाजार समितीचे संचालक प्रवीण देशपांडे व राष्ट्रवादीचे नेते गोपाळराव कोरे यांच्यासह त्यांचे सर्मथक कार्यकर्ते या पदयात्रेकडे फिरकले नाहीत. भाजपकडूनही मंद्रूपमध्ये पदयात्रा काढण्यात आली. मात्र, तालुक्यात काही ठिकाणच्या पदयात्रेत शिवसेना, रिपाइं या मित्रपक्षांचे कार्यकर्ते दिसले नाहीत.