आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदे यांनी केलेल्या मदतीचा लागेना छडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर चेंबर ऑफ कॉर्मसला गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या आर्थिक मदतीचा मंगळवारीही छडा लागू शकला नाही. 2012-13 या आर्थिक वर्षात 10 लाखांची ही रक्कम दिल्याचे बोलले जाते. या काळात तम्मा गंभिरे चेंबरचे उपाध्यक्ष तर मानद सचिव म्हणून श्रीनिवास वैद्य यांनी काम पाहिले होते. त्यावेळी श्री. वैद्य यांच्यावर अपहाराचा ठपका ठेवण्यात आला. पदावरून हटवण्यात आले. शिंदे यांच्या मदतीबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘एकूणच हे प्रकरण गंभीर आहे आणि तो गंभीरतेने सोडवले पाहिजे. प्रश्न सार्वजनिक पैशांचा आहे. व्यापार्‍यांच्या जिव्हाळ्याचा आहे. संबंधितांनी याबाबत प्रामाणिकपणे खुलासा करावा.’’ त्यांचे हे सूचक उद्गार तम्मा गंभिरे यांच्याकडे बोट दाखवते.


होटगी रस्त्यावरील ‘हेरिटेज’मध्ये रविवारी व्यापार्‍यांचा मेळावा झाला. त्यासाठी गृहमंत्री शिंदे आले होते. एलबीटीच्या मुद्दय़ावर व्यापार्‍यांनी शिंदेंना गळ घातली होती. त्यांना उत्तर देताना श्री. शिंदे म्हणाले, ‘‘एलबीटी प्रश्नावर आताही मुख्यमंत्र्यांशी बोलण्यास तयार आहे. परंतु राजकारण करू नका. चेंबरची स्वत:ची जागा असावी, इमारत असावी, यासाठी मी मदत केली. कुठे आहेत पैसे? बँकेतच आहेत ना.?’’ अशी विचारणा केली. हा प्रश्न अचानकपणे आल्याने मंचावर बसलेल्या काही पदाधिकार्‍यांनी मान डोलवली.


गेल्या दोन वर्षांत चेंबरमध्ये अनेक घडामोडी घडल्या. एलबीटी प्रश्नावरून व्यापार्‍यांत फूट पडली. निवडणुकीत सत्तांतर झाले. आता विद्यमान पदाधिकारी नवीन आहेत. त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या मदतीची रक्कम जमा आहे का हे सोमवारी तपासून पाहिले. परंतु त्याची नोंद कुठेच आढळून आली नाही. चेंबर ऑफ कॉर्मसच्या बँक खात्यांमध्येही रक्कम नाही. माजी आणि आजी पदाधिकार्‍यांनी काहीही माहीत नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे ही रक्कम गेली कुठे हा प्रश्न अनुत्तरितच आहे.


नाट्यसंमेलनाचे पैसे चेंबरला दिलेले नाही : यलगुलवार
सोलापुरात अखिल भारतीय नाट्यसंमेलन झाले. त्यातून शिल्लक असलेली रक्कम विविध संस्थांना देणगी म्हणून देण्यात आली. त्यातूनच चेंबरला मदत मिळाल्याचे काहींनी सांगितले. परंतु नाट्य परिषदेच्या सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी ते शब्द खोडून काढले. ‘नाट्य परिषद आणि चेंबरचा काहीही संबंध नाही. डॉ. निर्मलकुमार फडकुले सांस्कृतिक भवनसाठी 75 लाख, उपनगरीय शाखेला 5 लाख रुपये दिले’ असे त्यांनी स्पष्ट केले.


माहीत नाही हो.!
सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर चेंबरला कधी आणि किती रकमेची मदत केली. याची मला काहीही माहिती नाही. तम्मा गंभिरे, चेंबरचे माजी अध्यक्ष