आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदे साहेबांनी 10 लाख दिल्याचा मी साक्षीदार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ‘राहू द्या. चेंबरला देणगी म्हणून घ्या,’ असे म्हणत सुशीलकुमार शिंदे यांनी 10 लाख रुपये तम्मा गंभिरे यांच्या हातावर ठेवले. त्याचा मी साक्षीदार असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे कार्यकर्ते बाबूराव नेमिनाथ कासार यांनी बुधवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना केला. चेंबरचे माजी संचालक अरुण शर्मा यांनीही अशाच प्रकारचे गुपित उघड केले. ते म्हणतात, ‘‘अप्पांनी (गंभिरे) स्वत:हून मला सांगितले, की शिंदेसाहेबांनी चेंबरच्या इमारतीसाठी 10 लाख रुपये दिले. कमी पडत असतील तर आणखी देऊ असेही म्हणाले. ही बाब मी तातडीने प्रभाकर वनकुद्रे यांना सांगितली.’’ याबाबत वनकुद्रे यांना विचारले असता, त्यांनी या गोष्टीला पुष्टी दिली. या तिघांच्या बोलण्यातून सोलापूर चेंबर ऑफ कॉर्मसला श्री. शिंदे यांनी 10 लाख रुपये दिल्याचे स्पष्ट होते. परंतु श्री. गंभिरे यांनी त्यांची विधाने फेटाळून लावली. ‘‘मला शत्रू खूप आहेत. ते सर्वांना मॅनेज करताहेत,’’ असे त्यांचे म्हणणे आहे.


चेंबरला मिळालेल्या देणगी-पैशांबाबत मत-मतांतरे
बाबूराव कासार म्हणाले..
त्या दिवशी मी, गंभिरे आणि पशुपती माशाळ असे तिघे शिंदेसाहेबांच्या बंगल्यावर गेलो. त्यावेळी शिंदे यांनी स्वत:कडचे 10 लाख रुपये गंभिरे यांच्या हातात ठेवून, ‘चेंबरच्या इमारतीसाठी वापरा. देणगी समजा,’ असे म्हणाले. त्यानंतर है पैसे चेंबरच्या बँक खात्यात जमा होणे अपेक्षित होते. परंतु साहेबांनी स्वत: आठवण काढल्यानंतर हा पैसा कुठे गेला? याबाबत चर्चा सुरू झाली. त्यावर गंभिरे यांनी मला माहीत नाही, असे म्हणणे अतिशय गंभीर आहे.
अरुण शर्मा म्हणाले
त्या दिवशी चेंबरच्या कार्यालयात अप्पांनी मला स्वत:हून सांगितले, की शिंदेसाहेबांनी चेंबरला 10 लाख रुपये दिले. जागा घ्या, इमारत बांधा, रक्कम कमी पडत असेल तर आणखी देऊ, असाही त्यांचा निरोप आहे. ही बाब मी तातडीने चेंबरचे व्यवस्थापक मरगूर आणि प्रभाकर वनकुद्रे यांना सांगितली. आता अप्पा ही रक्कम घेतल्याचे नाकारतात, याचे आश्चर्य वाटते. व्यापार्‍यांच्या हितासाठी मिळालेल्या या पैशाचे काय केले, हे त्यांनी सांगावे.
प्रभाकर वनकुद्रे म्हणाले..
होय, अप्पांशी झालेला संवाद शर्मा यांनी मला सांगितला. त्यावर बरे झाले, चेंबरला स्वमालकीची इमारत होईल. आणखी पैसे जमवता येतील, असे मी त्यांच्याशी बोललो.
तम्मा गंभिरे म्हणाले..
मला बदनाम करण्यासाठी सगळे मॅनेज झाले. शर्मांना मी काहीही सांगितलेले नाही. शिंदेंनी कुणाला किती पैसे दिले, माहीत नाही. ते रोखीने होते की धनादेश होता, माहीत नाही.