आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - बिगरमोसमी पावसापासून आणखी किमान आठवडा तर सुटका नाही. तसा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 3 मार्चपासून देशात अनेक ठिकाणी वादळ, पाऊस आणि गारपीट सुरू आहे. एरवी या काळात उन्हाळा सुरू होतो. मागील आठवड्यात निसर्गाच्या तडाख्यामुळे शेतातील सर्व उभी पिके जवळजवळ नष्ट झाली आहेत.
समुद्र सपाटीपासून वाहणा-या जलयुक्त वा-यामुळे ही स्थिती उद्भवल्याचे पुणे हवामान खात्याच्या संचालिका सुनीता राव यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. छत्तीसगड येथून सुरू झालेले चक्रीवादळ पुढे महाराष्ट्र, गुजरात व राजस्थानच्या काही भागांत पोहोचले़ त्यामुळे या भागांत एकाच वेळी तीनही ऋतूंचा भास व्हावा अशी स्थिती निर्माण झाली आहे. आता दोन दिवस स्थिती स्थिर राहील़ परंतु, पुढचे दहा दिवस एकाच वेळी ऊन, वारा, पाऊस तसेच प्रसंगी गारपीट असे चित्र दिसण्याची शक्यता आहे़ महाराष्ट्रात आलेले चक्रीवादळ ओरिसातून सुरू झाले़ तेथील वा-याने बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणावर आर्द्रता निर्माण झाली़ तो जलयुक्त वारा मध्य भारतात आला. तेथे काहीसे कोरडे वारे असल्याने स्थिती आणखी बिघडली आहे, असे त्यांनी सांगितले.
पिके भुईसपाट
रविवारी व सोमवारी झालेल्या पावसात पिके भुईसपाट झाली आहेत. दरम्यान, सरकारी अंदाजानुसार नुकसानीची आकडेवारी एक हजार कोटींवर पोहोचण्याची शक्यता आहे. गेल्या 12 दिवसांत सर्वाधिक पाऊस 60 मि. मी. अक्कलकोट तालुक्यात झाला.
शेळवे परिसरात नऊ इंच गाराचा थर
पंढरपूर तालुक्यातील शेळवे परिसरात गारांचा नऊ इंच थर साचला होता. मंगळवेढा शहर परिसरातही जोरदार पावसासह गारांचा सडा पडला. दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तालुक्यासह बार्शी तालुक्याच्या पश्चिम व उत्तर पट्ट्यातील परिसरातही गारांसह पावसाने हजेरी लावली. सांगोला तालुक्यातही काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या.
‘गार’द शिवारात पुढा-यांचे पीक
मुख्यमंत्री चव्हाण आज सोलापुरात
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मंगळवारी सकाळी होटगी येथे पिकांची पाहणी करतील. मुंबईहून विमानाने सकाळी 10 वा. त्यांचे आगमन होईल. होटगीतील पाहणीनंतर ते विमानाने तुळजापूरला रवाना होणार आहेत.
निवडणुकीतही आंदोलन करू
गारपिटीमुळे शेतक-यांचे नुकसान झाले आहे. पंचनामे त्वरित करून भरपाई द्यावी. आचारसंहितेचे कारण सांगू नये. अन्यथा निवडणुकीमध्येही आंदोलन करावे लागेल.’’
सदाभाऊ खोत, प्रदेशाध्यक्ष, शेतकरी संघटना
10 दिवसांत सरासरी 38 मिमी नोंद, मार्चमध्ये जूनइतका पाऊस
एरवी मोसमी पावसाला सुरुवात झाल्यानंतर जूनमध्ये जेवढा होतो, तेवढा बिनमोसमी पाऊस गेल्या पंधरा दिवसांत झाला आहे. 26 फेबु्रवारी रोजी सुरू असलेल्या वादळी पाऊस व गारपिटीमुळे पिके, फळबागा उद्ध्वस्त झाल्या. सरकारदप्तरी सरासरी 38.24 मि.मीची नोंद झाली. एवढा पाऊस साधारणत: जूनमध्ये पडतो.
पवारांच्या भेटीत राजकीय ‘गाठी’
देशाचे कृषिमंत्री शरद पवार यांचा नुकसानीच्या पाहणीचा दौरा आटोपला. तीन दिवसांत पवारांनी उस्मानाबाद, बीड आणि परभणी जिल्ह्यात पाहणी केली. निवडणूक काळात ओढवलेल्या या आपत्तीतील दौ-यात राजकीय गाठीभेटी, बैठका क्रमप्राप्तच होत्या. तसे झालेही, परंतु पवारांनी यातही राजकीय ‘गाठी’ शोधल्या. दौरा केलेले तिन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीचे आहेत. उस्मानाबादेत पक्षाचे पद्मसिंह पाटील, तर बीडमध्ये सुरेश धस उमेदवार आहेत. परभणीतही विजय भांबळे यांना पक्षाचे तिकीट आहे. एवढेच नाही तर परभणी वगळता इतर मतदारसंघातील बहुतांश गावांची निवडही विधानसभा मतदारसंघाच्या गणितावर केल्याचे दिसते. यापुढचा दौरा पक्षाचे उमेदवार राजीव राजळे यांच्या अहमदनगर मतदारसंघात आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.