आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Unseasonal Rain, Hailstorm, Pandharpur,Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर, 3 बळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - वादळी वार्‍यासह आलेल्या पावसाने रविवारीही जिल्ह्याला तडाखा दिला. पंढरपुरात गारपीट झाली. वार्‍यामुळे झाड कोसळून व पत्रे उडाल्याने दोघांचा तर पाय घसरून पडल्याने एकाचा मृत्यू झाला. तर तीनजण जखमी झाले. पावसाने फळबागांसह रब्बी पिके उद्ध्वस्त झाली. शनिवारी सुरू झालेला पाऊस जिल्ह्यात अनेक ठिकाणी रविवारी सकाळपर्यंत सुरू होता. सकाळी उघडीप दिली. मात्र, दुपारी पुन्हा पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरू होता.


यशवंतनगर (ता. माळशिरस) येथे झाड कोसळून सोमनाथ भिवाजी भाकरे (वय 30, रा. भाकरेवाडी, ता. माळशिरस) हे ठार झाले. दुपारी चारच्या सुमारास सहकारमहर्षी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर कामावर असताना ही दुर्घटना घडली. कै. भाकरे यांच्या वारसदारांना एक लाख रुपये मदत देण्याचे कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते यांनी जाहीर केले. तसेच रात्री आठच्या सुमारास अकलूजसह महाळुंग, माळीनगर, र्शीपूर येथे गारांसह पाऊस पडला.


औंढी (ता. मोहोळ) येथे वार्‍यामुळे शेडवरील पत्रा उडून पडल्याने एक महिला वृद्धा ठार तर तिघे जखमी झाले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. यमुना वामन गोरे (वय 60) असे मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. तर छाया पडवळकर, पांडुरंग पडवळकर व बबन कोंडिबा गोरे यांचा जखमींमध्ये समावेश आहे. शनिवारी शाळेवरील पत्रे उडाल्याने लिपिकाचा मृत्यू झाला होता. दुसर्‍या दिवशी पुन्हा एका महिलेचा मृत्यू झाल्याने औंढी गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, तहसीलदार सदाशिव पडदुणे यांनी भेट देऊन घरांवरील पत्रे उडाल्याची पाहणी केली. रविवारी सायंकाळी वादळी वार्‍यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडाले होते.