आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Vijaysinha Mohite Contests Lok Sabha From Madha

निवडणुकीचा आखाडा: मोहितेंना करावी लागणार जुळवाजुळवीची कसरत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - जिल्ह्यातील बहुतांश नेत्यांचा विरोध एकहाती बाजूला सारत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभेसाठी विजयसिंह मोहिते यांच्या पारड्यात माप टाकले आहे. त्यामुळे थोरल्या पवारांची विजयसिंहांवर आजही मर्जी असल्याचे स्पष्ट होत आहे. आता मोहिते कुटुंबीय पक्षातील विरोधकांशी कसे जुळवून घेतात? 2009 च्या विधानसभा निवडणुकीतील अपघाताचा अनुभव पाहता मोहिते यंदाच्या निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जातात याकडे लक्ष असणार आहे.


सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या बहुतांश नेत्यांचा मोहितेंच्या उमेदवारीला पाठिंबा होता. रणजितसिंह मोहिते यांनी खासदारकीच्या काळात सातार्‍यात ‘साखर पेरणी’ केली होती. सध्या सोलापूर जिल्ह्यात मोहिते विरुद्ध आमदार बबनराव शिंदे, संजय शिंदे, माजी आमदार सुधाकर परिचारक असा कडवा राजकीय संघर्ष सुरू आहे. तो निकाली निघणार का? याकडे लक्ष आहे. पंढरपूरमध्ये आमदार भारत भालके, कल्याणराव काळे, आमदार शामल बागल, माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा गट मोहितेंच्या सोबत असल्याची चर्चा आहे. करमाळ्यात मोहितेंचा स्वतंत्र गट आहे, मात्र सांगोल्यामध्ये आमदार गणपतराव देशमुख, आमदार दीपक साळुंखे, माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासोबत मोहितेंची दिलजमाई झाल्याचे अद्यापही पुढे आलेले नाही. माळशिरसमध्ये मोहिते विरोधकांची संख्या वाढली आहे. तरीही विजयसिंहांचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे राजकारण पाहता सर्व जुने लोक त्यांना मदत करतील, अशी चर्चा आहे. एकूणच मोहितेंची स्वतंत्र प्रचार यंत्रणा आणि राष्ट्रवादीतील त्यांच्या विरोधकांची यंत्रणा कशा पद्धतीने काम करते ही यंदाच्या निवडणुकीतील रंगतदार गोष्ट असेल.


पवारांसाठीही महत्त्वाची निवडणूक
यंदाची लोकसभा निवडणूक मोहितेंच्या राजकीय भविष्यासाठी महत्त्वाची आहेच, तशीच ती पवारांसाठी आहे. माढय़ाची जागा शरद पवारांची आहे. या जागेकडे संपूर्ण देशाचे लक्ष असेल. पक्षांअंतर्गत कुरघोड्यामुळे दगाफटका झाल्यास जिल्ह्यातील इतर नेत्यांनाही त्याची झळ सोसावी लागेल.


मने दुखावली, आता पवारांनाच यावे लागेल
गेल्या साडेचार वर्षात एकमेकांवर कुरघोड्या करण्याची संधी सर्वच नेत्यांनी वेळोवेळी घेतली. त्यामुळे सर्वच नेते एकमेकांवर नाराज आहेत. निवडणूक काळात ही नाराजी दूर करण्यासाठी शरद पवारांनाच मैदानात उतरावे लागेल.


मने दुभंगली असली तरी
विजयसिंहांनी गेली 25 वर्षी चांगले काम केले आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारा माणूस ही त्यांची प्रतिमा आहे. शरद पवारांनी सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील सिंचनासाठी मोठा निधी दिला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कामे करायची आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्याचे राजकारण करायचे, असा प्रकार कायम आहे. त्याचा परिणाम होणार नाही. राष्ट्रवादीतील काही नेत्यांची मने दुभंगली असली तरी मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत सर्वांनीच विजयसिंहांना निवडून आणण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे विजयसिंह कोणत्याही परिस्थितीत निवडून येतील.’’ मनोहर डोंगरे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस