आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Vijaysinha Mohite, Prashant Paricharak, Lok Sabha

मदत विधानसभेला केलीच, लोकसभेलाही करू;मोहितेंबाबत प्रशांत परिचारक यांचे स्पष्टीकरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर / पंढरपूर - गेल्या 45 वर्षांत आम्ही विजयसिंह मोहिते यांच्यासाठीच काम केले आहे, त्यांनी पुढे जावे म्हणून सहकार्य केले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीतही प्रामाणिकपणे काम केले, आता माढा लोकसभा मतदारसंघातही त्यांच्यासाठी काम करू. असे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यानंतर मोहिते यांनी जुळवाजुळव सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रणजितसिंह जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांना भेटले. त्यात लोकसभेच्या निवडणुकीत मोहिते आणि केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठीच काम करू, अशी भूमिका परिचारक यांनी स्पष्ट केली. सोमवारी सकाळी अर्बंन बँकेच्या कार्यालयात दोघांमध्ये दीड तास गुफ्तगू झाली. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून मोहिते यांचा पराभव झाल्याने गेल्या तीन वर्षांपासून मोहिते आणि परिचारक यांच्यामध्ये दुरावा होता. दोघांनीही एकमेकांवर राजकीय कुरघोड्या केल्या होत्या. त्यामुळे या भेटीकडे लक्ष लागले होते.


भालकेंसोबत विजयदादा
जिल्ह्याच्या राजकारणात सुधाकर परिचारक यांच्यासोबत वाद झाल्यामुळे अडीच वर्षांपूर्वी मोहिते आणि भालके यांच्यात दिलजमाई झाली आहे. आता लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने रणजितसिंह मोहिते यांनी परिचारकांसोबत वाद शमवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विजयसिंहांनीही आमदार भालकेंना सोबत घेऊन प्रचार सुरू केला आहे. रविवारी माढा तालुक्यातील एका लग्नासाठी विजयसिंह मोहिते आणि आमदार भालके गेले होते. परतताना दोघांनीही राष्ट्रवादी युवक काँग्रसचे माजी जिल्हाध्यक्ष संजय कोकाटे यांच्या टेंभुर्णीजवळील पेट्रोल पंपावर थांबून माढा, पंढरपूर भागातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला.


परिस्थितीनुसार निर्णय
विजयसिंह आणि आम्ही एकत्रच आहोत. राजकारणात कोणीच कायमचा शत्रू आणि मित्र नसतो. पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणाची हीच परंपरा आहे. आम्हाला परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एकमताने विजयसिंह मोहिते यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळेच आम्ही त्यांना मदत करीत आहोत. आमदार भारत भालके, पंढरपूर.


विधानसभा लढवणारच
परिचारक घराण्याने आतापर्यंत राष्ट्रवादीसाठी मनापासून काम केले आहे. राष्ट्रवादी पक्ष एकसंध राहावा, यासाठीच सुधाकर परिचारकांनी माघार घेतली होती. आमच्या निष्ठेचे पक्ष श्रेष्ठींकडून चीज होत नसेल तर येत्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी कोणाचेही ऐकणार नाही. कोणत्याही परिस्थितीत विधानसभा लढवणार आहोत. प्रशांत परिचारक, अध्यक्ष, जिल्हा दूध संघ

कोणाचेही ऐकून विश्वासाला तडा जाऊ देऊ नका
परिचारक म्हणाले, ‘मोहितेंनी कोणाचेही ऐकून आमच्यावरच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नये. आमचे कोणाबद्दल काहीही समज, गैरसमज नाहीत. मात्र मोहितेंचे आहेत की, नाहीत याबद्दल मी कसे सांगणार?’ असा सवालही त्यांनी केला. सोलापूर मतदारसंघासाठी काम केले म्हणून माढय़ाकडे दुर्लक्ष होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.