आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur News In Marathi, Vijaysinha Mohite, Pratapsinha Mohite, Divya Marathi

मोहिते कुटुंबात संघर्ष नि.. महायुतीत अंतर्गत बंडाळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकलूज - आघाडीकडून विजयसिंह आणि अपक्ष म्हणून प्रतापसिंह या मोहिते बंधूंनी एकमेकांविरुद्ध दंड थोपटल्यामुळे दोघांनाही मानणार्‍या तालुक्यातील कार्यकर्त्यांची कोंडी निर्माण झाली आहे. मोहिते बंधूंमधील राजकीय वितुष्ट संपले पाहिजे, अशी भावनाही त्यांच्यातून व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे महायुतीचे उमेदवार सदाभाऊ खोत यांच्या मताधिक्क्यासाठी मोहिते विरोधकांना एकत्र करण्यासाठी उत्तम जानकर प्रयत्नशील आहेत.


मोहिते कुटुंबातील राजकीय संघर्षाचा लाभ उठवण्यासाठी महायुतीचे नेते सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. महायुतीतील नाराजांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न विजयसिंह करीत आहेत. मोहिते बंधूंच्या संघर्षावर तोडगा काढण्याचा प्रयत्न माजी जिल्हा परिषद अध्यक्ष फत्तेसिंह माने-पाटील यांनी केला. मात्र, त्याला यश आले नाही. ज्या पद्धतीने प्रतापसिंह मोहिते सध्या प्रचार कार्याला लागले आहेत, त्यावरून ते आता माघार घेतील, अशी शक्यता दिसत नाही.
महायुतीच्या खोत यांच्या प्रचारासाठी उपसभापती उत्तम जानकर, प्रा. जयंत बगाडे, के. के. पाटील, नामदेव वाघमारे, राजुमार पाटील आदी प्रयत्नशील आहेत. महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत राजकुमार पाटील (भाजप), नामदेव वाघमारे (शिवसेना), बाळासाहेब लवटे आणि प्रा. जयंत बगाडे यांच्या भाषणातून महायुतीमधील मतभेद उघडकीस आले. शेतकरी संघटनेकडून वेळापूर जिल्हा परिषद गटाची निवडणूक लढवलेले रणजितसिंह जाधव, इस्लामपूरचे डॉ. रामदास देशमुख हे महत्त्वाचे नेते अद्याप महायुतीच्या व्यासपीठावर दिसले नाहीत. शेतकरी संघटनेचे जिल्हा परिषद सदस्य अँड. सुभाष पाटील यांनी तर आम आदमी पार्टीला पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेसचे अँड. रामहरी रूपनर, राजेंद्र गिरमे हे आता विजयसिंहांच्या बाजूने आहेत. काँग्रेसच्या महिला प्रदेश सरचिटणीस श्रीलेखा पाटील आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील हे तर विजयसिंहांचे कडवे विरोधक आहेत. पण, त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट नाही.
महाळुंग मंडलातील 14 गावात खोत यांची लोकप्रियता वाढली आहे. आमदार बबनराव शिंदे यांनी विजयसिंहांचा प्रचार सुरू केला असला तरी त्यांचे सर्मथक कितपत प्रचारात उतरतील, हे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.