आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूरला पासपोर्ट कार्यालय आणू - सुशीलकुमार शिंदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - प्रत्येक भारतीयाला पासपोर्ट घेण्याचा अधिकार आहे. तो मिळवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालये देण्याचे केंद्राने ठरवले. त्याचे कार्यालय सोलापूरला आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शनिवारी येथे सांगितले.


सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत विस्तारित समाधान योजनेतून पासपोर्ट शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. पुण्याच्या पासपोर्ट कार्यालयातील अधिकारी नरेंद्र सिंग, अप्पर जिल्हाधिकारी अशोक काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख आदी मंचावर होते.


शिंदे पुढे म्हणाले, ‘काँग्रेसच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अनेक लोकाभिमुख योजना अमलात आणल्या. सामान्य माणूस केंद्रस्थानी मानून त्याच्या रोजच्या जगण्यातील प्रश्न सोडवले. त्यातूनच अन्न सुरक्षा ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू झाली. सामान्य ते मध्यमवर्गीयांचे जीवनमान उंचावताना काही कठोर निर्णयही घेतले. देशातील मुले उच्चशिक्षित होऊन परदेशी जाण्याचे प्रमाण वाढले. त्यासाठी पासपोर्ट आवश्यकच झालेले आहे. ही गरज ओळखून प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याचा केंद्राचा विचार आहे.’


या वेळी सातारा, सांगली येथून अर्जदार आले होते. ऑनलाइनने ज्यांनी अर्ज भरला, त्यांनाच या शिबिरासाठी बोलावण्यात आले आहे. रविवारीही हे शिबिर राहणार आहे.


पासपोर्टसाठी काय हवे
जन्म दाखला, रहिवासी पुरावा, आधार कार्ड, शिधापत्रिका, विवाहित असाल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र, घटस्फोट घेतल्यास त्याची कागदपत्रे, विधवा अथवा विधूर असल्यास संबंधितांचे मृत्यू दाखले.


ऑनलाइन अर्जावर अचूक माहिती द्या
पासपोर्टसाठी अर्ज ऑनलाइनने भरताना अचूक माहिती द्यावी. दिलेल्या माहितीची तपासणी होते. त्यात त्रुटी निघाल्या तर विलंब होतो. माहिती अचूक असेल तर कमी वेळात पासपोर्ट मिळेल. याची काळजी नागरिकांनी घ्यावी.’’ नरेंद्र सिंग, अधिकारी पासपोर्ट कार्यालय, पुणे