आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोलापूर - जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विरोधातील उपोषणस्थळी शनिवारी ज्येष्ठ संचालक भाई एस. एम. पाटील यांनी धाव घेतली. थकीत कर्जवसुलीसाठी महिन्याची मुदत द्यावी, अशी मागणी केली. परंतु उपोषणकर्त्यांनी त्यास साफ नकार दिला. दोषींवर फौजदारी गुन्हे नोंदवलेच पाहिजेत, अशी ठाम भूमिका मांडली. त्यामुळे वाटाघाटी फिसकटल्या. शनिवारी तिसर्या दिवशीही उपोषण सुरूच ठेवले. रविवारी खासदार राजू शेट्टी आंदोलनस्थळी येणार आहेत. त्यामुळे हे आंदोलन अधिक पेटण्याची चिन्हे आहेत.
जिल्हा बँकेच्या संचालकांनी स्वत:च्या साखर कारखान्यांना, शैक्षणिक संस्थांना नियमबाह्य कर्जे घेतली. ती जाणीवपूर्वक थकीत ठेवली. त्यामुळे सामान्य शेतकरी पीककर्जापासून वंचित राहिला. त्याची जबाबदारी दोषी संचालकांवर निश्चित करून फौजदारी गुन्हे नोंदवावेत, त्यांची मालमत्ता जप्त करावी, या मागण्या घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बेमुदत उपोषण सुरू केले आहे. शनिवारी त्याचा तिसरा दिवस होता.
सायंकाळी श्री. पाटील, प्रभारी सरव्यवस्थापक किसन मोटे चर्चेसाठी आले होते. कर्जवसुलीसाठी महिन्याची मुदत द्यावी, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. तो फेटाळून लावताना उपोषणकर्ते संजय पाटील-घाटणेकर, दीपक भोसले यांनी दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा आग्रह धरला. त्यामुळे तोडगा निघाला नाही.
साखर गोदामे तपासा
स्वत:च्या कारखान्यांसाठी कर्जे घेतलेल्या काही संचालकांनी गोदामात साखरही ठेवली नाही. ती बँकेकडे तारण असतानाही परस्पर विक्री केली. लेखापरीक्षणातून ही बाब उघडकीस आली आहे. त्याच्या आधारे तरी संबंधितांवर गुन्हे दाखल करा. संजय पाटील-घाटणेकर, प्रदेश सचिव, स्वाभिमानी संघटना
दिवसभरातल्या घडामोडी
1. दुपारी 12 वाजता भाई पाटील, अरुण कापसे, मोटे यांची शिष्टाई
2. दुपारी दोनला जिल्हा उपनिबंधकांनी बँकेला पुन्हा धाडले पत्र
3. सायंकाळी सहाला भाई पाटील, मोटे चर्चेसाठी आंदोलनस्थळी
4. साडेसहा वाजता खासदार राजू शेट्टी येणार असल्याचा निरोप
5. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने वैद्यकीय तपासणी केली
6. रात्री उपोषणकर्त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचे प्रयत्न
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.