आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोलापूर - वेळप्रसंगी माझी ओंजळ रिती पडली असेल, परंतु सोलापूरकरांचा माझ्यावरील प्रेमाचा वर्षाव कायमच चालू आहे. या प्रेमाने मी भारावून गेलो. या कार्यक्रमा निमित्ताने मला जुन्या-नव्या सवंगड्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली आहे, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
विकासनगर परिसरातील यलगुलवार प्रशालेत शहर-जिल्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुशीलकुमार शिंदे यांनी केलेली विकासकामे आणि कार्याचा गौरव करण्यासाठी कृतज्ञता सोहळा आयोजिला होता. या वेळी ते बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.
या वेळी बोलताना नामदार शिंदे म्हणाले, 1998-99 साली सर्वसाधारण लोकसभा जागेवर मला निवडून दिले. निवडूनच नव्हे तर एक लाखाचे मताधिक्क्य दिले. यावरून आपण माझ्यावर किती प्रेम करता, हे दिसते. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी मला ‘युनो’त भाषणासाठी पाठवले. त्याकाळी मी संसदेत बोलायला उभा राहिलो तर माझ्याकडे बोट करून सर्वजण हा जनरल सीटवर निवडून आलाय, असे म्हणायचे असेही ते म्हणाले. या वेळी उज्ज्वला शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, दिलीप माने, बाळासाहेब शेळके, विष्णूपंत कोठे, महेश कोठे, सिद्धाराम म्हेत्रे, प्रकाश यलगुलवार, विश्वनाथ चाकोते, निर्मला ठोकळ, महापौर अलका राठोड, धर्मा भोसले, राष्ट्रवादीचे महेश गादेकर, दिलीप कोल्हे, मनोहर सपाटे उपस्थित होते.
शिंदे खरोखर गहिवरले..
माझ्याबद्दल एकाने बोलले होते की, हा ‘बुढ्ढी का बाल’ विकणारा होता. आता ते असे म्हणतील का? पण मी ते विसरू शकत नाही. आता कुठे विकायला पाठवतात बघू? कधी कधी भावना आवरता येत नाहीत, असे म्हणत गृहमंत्री शिंदे गहिवरले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.