आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Pilgrims Safe Return From Uttarakhand Flood

सोलापूरकडे यात्रेकरू मार्गस्थ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर शहर व जिल्ह्यातून चारधाम दर्शनासाठी उत्तराखंडला गेलेल्या यात्रेकरूंना सोलापूरकडे मार्गस्थ करण्यास सुरुवात झाली आहे. बहुतेक यात्रेकरू बद्रिनाथ, केदारनाथ, हृषीकेश, गंगोत्री, हरिद्वार येथून बाहेर पडले आहेत. गोतसर येथे काहीजण अडकले असले तरी सुरक्षित आहेत, त्यांना हेलिकॉप्टरने आणले जाणार आहे. सर्वांना प्रवासासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये, जेवण व औषधोपचाराची मदत देण्यात आली आहे, अशी माहिती डेहराडून येथे मदतकार्यात सहभागी झालेले उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर (सोलापूर) यांनी दिली.

श्री. नाटेकर हे डेहराडून येथे पोहोचले असून ते मदतकार्यात सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज तेथे होते. आज दिवसभरात मोहोळ येथील 40 यात्रेकरू (वैष्णवी ट्रॅव्हल्समार्फत गेलेले) परतीसाठी इलाहाबाद, नागपूरमार्गे निघाले आहेत. त्यांच्यासमवेत शहाजी जाधव हे प्रमुख आहेत. कामती खुर्द येथील 21 जण मथुरा-आग्रामार्गे निघाले आहेत. पंढरपूर येथील नंदकिशोर भट्टड व इतर 21 जण हरिद्वारमधून बाहेर पडले आहेत ते परतीला निघाले आहेत. जुळे सोलापुरातील विजय पोखर्णा व कांचन पोखर्णा (पती-पत्नी) हृषीकेश येथून परतीसाठी निघाले आहेत. पूर्व भागातील 14 जण गंगोत्रीत असून त्यांना सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले आहे. त्यांना सोलापूरला पाठवण्याची सोय करण्यात आली आहे. नरखेड (ता. मोहोळ) येथील काहीजण विमानाने पुण्याला रवाना झाले आहेत. सुर्डी (ता. बाश्री) येथील 11 जण सुरक्षित असून, तेही सोलापूरला पोहोचतील.

मुख्यमंत्री दिल्लीत
राज्यातील पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीत तळ ठोकून आहेत. सोमवारी ते दिल्लीत दाखल झाले. जे पर्यटक सुखरूप परतले, त्यांच्याशी त्यांनी महाराष्ट्र सदनात संवाद साधला. त्यानंतर त्यांनी डेहराडूनसाठी रवाना झाले. सोमवारी पुन्हा सायंकाळी साडे पाचच्या सुमारास दिल्लीतील महाराष्ट्र सदनात परतले. रात्री उशिरा ते मुंबईकडे रवाना झाले.

महाराष्ट्रातील 400 पर्यटकांची सुखरूप सुटका
उत्तराखंडच्या महाप्रकोपात अडकलेल्या राज्यातील 350 पर्यटकांना रविवारी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात निवर्‍यासाठी आणले होते. तिथे त्यांना सर्व सेवा दिल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या घराकडे रवाना झाले आहेत. सोमवारी रात्री 50 जणांनी महाराष्ट्राची वाट धरली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील बाश्रीचे 10 जण असल्याचे महाराष्ट्र सदनातील अधिकारी नितीन गायकवाड यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

सर्व पर्यटकांच्या निवास, भोजनाची तसेच वैद्यकीय सेवेची सोय केली आहे. पर्यटकांच्या गरजेनुसार रेल्वेने तिकिटाची सोय केली. खासगी वाहन घेऊन आलेलेही परतीच्या प्रवासाला निघाले. पर्यटकांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात आले.


21 पर्यटक सुखरूप; जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांची माहिती
उत्तराखंड येथील नैसर्गिक आपत्तीमध्ये जिल्ह्यातील 21 पर्यटक अडकलेले असले तरी सुखरूप आहेत. जिल्ह्यातून गेलेल्या 170 पर्यटकांपैकी 7 पर्यटक सुखरूप घरी परतले आहेत. 141 जण परतीच्या प्रवासाला निघाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली.

जिल्ह्यातून गेलेल्या यात्रेकरूंच्या व त्यांच्या नातेवाइकांच्या माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित आहे. उत्तराखंड येथे अडकलेल्या व्यक्तींच्या मदतीसाठी सोलापूर जिल्ह्यातून अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी, गवळी, परिमंडळ नायब तहसीलदार, तहसील कार्यालय (मोहोळ) हे उत्तराखंड येथे गेलेले आहेत.

अमृत नाटेकर (9422616033) व गवळी (8390387206) तसेच उत्तराखंड येथील कंट्रोल रूमचा दूरध्वनी क्रमांक 0135 - 2190018 असा आहे. जे यात्रेकरू परत आलेले आहेत, त्यांनी जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी गेडाम यांनी केले आहे.