आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांची निष्क्रियताच कारणीभूत; छेडछाडीबद्दल संवेदनशीलता वाढत असल्याचे संकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- क्राईम रेटमध्ये सोलापूर शहर राज्यात आघाडीवर आहे. असे असले तरी छेडछाडीच्या घटनांबद्दल सोलापुरात समाजमनाची संवेदनशीलता जागृत झाल्याचे संकेत मिळाले आहेत. महिलांवर अत्याचार करण्याची, छेडछाड करण्याची समाजातील दुष्प्रवृत्ती ठेचण्यात पोलिस यंत्रणा कमी पडतेय. पोलिस यंत्रणेचा अशा प्रवृत्तींवर वचकच राहिलेला नाही. कदाचित यामुळेच महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत असल्याची भावना सोलापूरकरांनी ‘दिव्य मराठी’च्या सर्वेक्षणातून नोंदवली आहे.

देशाच्या राजधानीत ‘निर्भया’वर दुष्कृत्य करणार्‍या आरोपींना न्यायालय शुक्रवारी फाशी ठोठावेल अशी आशा सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे सोलापूरचे प्रतिनिधित्व करतात. गृहमंत्र्यांच्या शहरात नागरी समाजातील विविध घटकांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न सर्वेक्षणातून करण्यात आला आहे.

अत्याचाराच्या घटनांबद्दलचा दृष्टिकोन, महिलांची सुरक्षितता, कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिसांची कार्यक्षमता, महिलांची जबाबदारी अशा विविध प्रश्नांवर तरुण, तरुणी, व्यावसायिक, गृहिणी, नोकरदार अशा विविध स्तरातील नागरिकांनी आपले मत नोंदवले. सर्वेक्षणातून पुढे आलेल्या बाबींवर आधारित वार्तांकन येथे मांडले आहे.

बदल सकारात्मक दिसतोय
लोकांच्या अंतर्मनात सेन्सॉरशीप येणे. पोलिस आणि न्याय यंत्रणा गतिमान झाल्याचे दिसणे याबाबी सकारात्मक आहेत. दिल्लीच्या घटनेनंतर अवघ्या 8 महिन्यात दोषींना शिक्षा सुनावण्यापर्यंत पोहोचणे चांगली बाब आहे. त्यात इथल्या माध्यमांचा महत्त्वाचा वाटा आहे. आजही स्त्री अत्याचाराच्या घटनांकडे जात-वर्ग अंगानेच पाहिले जाते.
-अरुणा बुरटे, समुपदेशक

अत्याचार घटनेत महिला नसतात दोषी
59 टक्के लोकांनी सोलापूर शहर महिलांच्या दृष्टीने सुरक्षित नाही, असे मत नोंदविले. 26 टक्के जणांनी सुरक्षित असल्याचे तर 15 टक्के लोकांनी सांगता येत नाही, असे उत्तर दिले. 73 टक्के लोकांना पोलिसांचा वचक कमी झाल्याचे वाटते. अत्याचाराच्या काही घटनांना महिलाही जबाबदार असतात, असे 25 टक्क्यांना वाटते, पण 52 टक्के लोकांनी नाही तर 21 टक्क्यांनी सांगता येत नाही, असे सांगितले.

कठोर शिक्षेतूनच येईल दडपण
डिसेंबरमध्ये निर्भयावरील अत्याचारानंतर सोलापुरात लिंगभेद विषयीची संवेदनशीलता वाढली तरीही 87 टक्के लोकांना अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचे वाटते. आरोपींवर कठोरात कठोर शिक्षा झाली, तर अशा घटना रोखता येतील, असे 63 टक्के लोकांना वाटते. 23 टक्के नागरिकांना केवळ शिक्षा झाल्याने अत्याचार रोखले जाईल, असे वाटत नाही. त्यासाठी लिंग समानता जागृतीची गरज भासत असावी.

लिंगभेद कमी होण्याकडे कल
स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनांबद्दल सोलापूर अधिक संवेदनशील होत आहे. महाविद्यालयीन तरुणींना विशेषत: तो बदल जाणवत आहे. महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो, असा विश्वास महिलांना व एकूणच समाजाला वाटू लागला आहे. हे लिंगभेद कमी होण्याचे लक्षण मानले पाहिजे. तरीही सुमारे 34 टक्के लोकांनी समाजमन बदलत नाही तर 13 टक्के जणांनी सांगता येत नाही, असे मत नोंदविले.

पोलिस कायद्याची अंमलबजावणी करतात
गुन्हा केला आहे, त्यांना शासन झालेच पाहीजे. शिवाय शिक्षा देणे हे काम न्यायालयाचे आहे. सर्व धर्मातकुटुंबव्यवस्था ही आहेच. कुटुंबातील प्रत्येकाने एकमेकांच्या संवेदना जपल्या तर असे प्रकार होणार नाहीत. लिंग स्त्री असो वा पुरुष लहानपणापासूनच त्यांच्यावर संस्कार करणे गरजेचे आहे. तसेच वचक हा पोलिसांचा नसतो तर कायद्याचा असतो आणि त्याचीच अंमलबजावणी पोलिस करतात. ज्यावेळेस तक्रारी येतात, पोलिस त्याचा तपास करतात. कायद्याचा वचक कमी झालेला नाही. प्रदीप रासकर, पोलिस आयुक्त