आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Politics News Of Bjp Mp Subhash Deshmukh

‘माझ्या नावावरून रणकंदन झाले, मला फरक पडत नाही’; माजी खासदार देशमुख यांनी दिली उत्तरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ‘राजकारण हे राजकारण आहे. त्यात कोणी दोस्त नसतो की दुश्मन. शिवाय शहकाटशह केल्याशिवाय राजकारणात राहण्याला किंमत नसते. कार्यकर्त्यालाही कधीतरी काहीतरी व्हावे, पद मिळावे, तिकीट मिळावे असे वाटत असते आणि असे वाटणे साहजिक आहे. माझ्या नावावरून रणकंदन झाले असले तरी मला काही फरक पडत नाही,’ हे बोल आहेत भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार सुभाष देशमुख यांचे.

लोकमंगल समूहाचे संस्थापक असलेल्या देशमुख यांनी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, तो मंजूर झालेला नाही. लोकसभा निवडणुकीत उमेदवारीच्या मुद्द्यावरून ते नाराज असल्याचे बोलले जाते. त्यांचे पुत्र रोहन देशमुख यांनी अपक्ष म्हणून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती. पुत्राचे अपक्ष उभे राहाणे हे देशमुखांचेच पक्षाविरुद्ध बंड असल्याचे भाजप-शिवसेनेच्या नेत्यांचे मत आहे. आगामी विभानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी रोखठोक भूमिका व्यक्त केली.

श्री. देशमुख म्हणाले की, पहिल्यापासून पक्षाने दिलेले आदेश पाळले आहेत. म्हणूनच मला इतक्यावेळी विविध मतदारसंघातून उमेदवारी मिळाली ना? मी कधीही उमेदवारीची मागणी केली नाही. पक्षाला योग्य वाटल्याने उमेदवारी दिली आणि मिळालेल्या आदेशानुसार मी काम केले. आगामी विधानसभा निवडणुकीतही कोठूनही उमेदवारी मागितलेली नाही. पक्षाने आदेश दिले तर जबाबदारी यशस्वीरीत्या पेलेन याची खात्री आहे.

उस्मानाबादेतील शिवसेनेचे खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांनी ‘मॅनेज’ नेत्यांना धडा शिकण्याचे पत्रक काढले आहे. त्यांचा रोख देशमुखांकडे आहे. त्याविषयी विचारले असता देशमुख म्हणाले की, पक्षाविरोधात उमेदवार उभा केला होता, असे नाही. मुलगा उभा होता. परंतु हेदेखील चुकीचे वाटत असेल म्हणून पक्षाकडे पदाचा राजीनामा दिला.

राजकारणात जो तो त्याच्या नशिबाने पुढे जात असतो. 35-40 वर्षांची घनिष्ठ मैत्री असलेले राजकारणातील धुरंधर नेते एकमेकांपासून दूर जातात. कोठे आणि सुशीलकुमार शिंदे यांचे उदाहरण समोर आहे. कार्यकर्त्याला वाटते की आमच्यामुळे नेता मोठा झाला आणि नेत्याला वाटत असते की आम्ही कार्यकर्ते घडवले.
‘ माझ्यासाठी टीका सल्लाच’
पक्षात असतानाही माझ्यावर टीका झाली. मी तो सल्ला म्हणून मानत आलो. माझ्यातील दोष दूर करण्याचा प्रयत्न करतो. लोकमंगल हे एक मॉडेल करण्याचा प्रयत्न असतो. पंतप्रधानांचे भाषण आपण ऐकले असेल. त्यांच्या विचारांनी जात असल्याचे वाटत नाही का? राष्ट्र वैभवशाली व्हावे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आम्हीही खारीचा वाटा उचलत आहोत. ते पंतप्रधान झाले म्हणून आम्हाला एक दिशा मिळाली आहे. मला काय मिळते यापेक्षा मी काय देतो? हे पाहावयास हवे.