सोलापूर - रिक्षांचे संप असताना मनपा परिवहन उपक्रम विभागाने नियोजन करून आवश्यक त्या मार्गावर मागणीप्रमाणे गाड्या सोडल्या. त्यादिवशी परिवहनचे उत्पन्न ७.४६ लाख मिळाले. त्यानंतर तीन दिवसांचे उत्पन्न पाहता त्यात कमालीची घट झाल्याचे दिसून येते. परिवहन समिती दररोज नियोजन करीत नसल्याचेच यावरून पुढे आले आहे. एका दिवसाचे नियोजन जमते, दररोजचे का नाही? असा प्रश्न समोर आला आहे.
महापालिका परिवहन विभागात केंद्राच्या जेएनयूआरएम योजना अंतर्गत १७० बस आल्या आहेत. आजच्या परिस्थितीला शहरात ८५ ते ९० गाड्या रस्त्यावर धावतात. इतर बस चालक वाहकांअभावी बंद आहेत. त्यासाठी चालक वाहक पदे भरण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. उपलब्ध मनुष्यबळावर १२५ गाड्या रस्त्यावर धावणे आवश्यक असताना धावत नाहीत.
संपा दिवशी उत्पन्न नंतर मात्र थंड
बुधवारी शहरात रिक्षाचालकांनी संप पुकारला होता. त्याकाळात परिवहन विभागाकडून नियोजन करून गरज असलेल्या मार्गावर बस सोडल्या. त्यामुळे प्रवाशांची पायपीट झाली नाही. वेळेत बस सोडल्याने परिवहनचे उत्पन्न ४.५ लाखांऐवजी ७.४८ लाख इतके झाले. त्यानंतर मात्र पुन्हा जैसे थे परिस्थिती आहे. हे करीत असताना ग्रमीण भागात जाणाऱ्या काही बसेस अॅडजेस्ट करून शहरातील मार्गावर सोडल्या.
जादा बसेस फेऱ्याही वाढविल्या. एका दिवसात प्रवाशांना बऱ्यापैकी वेळेवर बसेस मिळाल्या. महापालिका परिवहन विभागाने दररोजच रिक्षाचा बंद आहे, असे समजून जर हे नियोजन कायम ठेवले तर शहरातील प्रवाशांचीही सोय होईल आणि डबघाईला आलेल्या परिवहन समितीलाही ऊर्जितावस्था येईल.
रिक्षाचा संपचा दिवस
बुधवारी शहरातील रिक्षाचालकांनी संप पुकारला होता. त्यादिवशी प्रवाशाच्या गरजेनुसार बस सोडल्या. त्यामुळे उत्पन्न वाढले. इतरवेळी प्रवासी नसतात म्हणून बस सोडत नाही. आगामी काळात नवीन मार्गावर गाड्या सोडल्या जातील. प्रवाशांच्या गरजेनुसार नियोजन करण्यात येईल'' श्रीकांतम्याकलवार, मनपापरिवहन व्यवस्थापक
सेवा अगोदर की, प्रवासी?
परिवहनचे अधिकारी, कर्मचारी रिक्षा बंद असल्याने प्रवासी मिळाले असा दावा करतात. हा दावा अर्धसत्य मानला तरी महापालिकेने जर चांगली आणि वेळेवर सेवा दिली तर प्रवासी मिळतील, अगोदर सेवा देऊन ‘बस वेळेवर येतात’ असा विश्वास निर्माण करण्याची गरज आहे. ते जर एकदा झाले तर बसेसला रिक्षा बंद दिवशी जी गर्दी मिळाली ती दररोज मिळेल. चांगली सेवा मिळाल्यास प्रवासी संख्या वाढेल. मात्र अगोदर सेवा की गर्दी या गोंधळात परिवहन समिती दिसते आहे.
परिवहन व्यवस्थापक सिटीबस डेपोत येत नाहीत. त्यामुळे नियोजन नाही. आम्हीच फिरून पाहणी करतो. व्यवस्थापक येऊन नियोजन केल्यास १२५ बस मार्गावर धावतील आणि उत्पन्नात लाखाने वाढेल.'' सलिमसय्यम, मनपापरिवहन व्यवस्थापक