सोलापूर - सामान्य नागरिकांसाठी महापालिकेने 24 तास पाणी असलेल्या सार्वजनिक नळांची सोय केली आहे. जुना बोरामणी नाका येथील गवई गल्लीत मात्र देशी दारूच्या दुकानात नळावरून प्लास्टिक पाइप टाकून पाणी नेले जात असल्याचे समोर आले आहे. हॉटेल असो की दारू दुकान येथे लागणार्या पाण्यास व्यावसायिक दर लावला जातो. इथे मात्र सार्वजनिक नळ चक्क दारू दुकानात पाइप लावून नेल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे.
मनसेचे महिंद्रकर यांचे नातेवाइक
मनसेचे शहरप्रमुख भूषण महिंद्रकर यांचे नातेवाइक भारत महिंद्रकर यांच्या मालकीचे ते देशी दुकान आहे. मनपाच्या सार्वजनिक नळाला पाइप लावून दुकानात व्यवसायासाठी पाणी घेतले जाते. याकडे महापालिकेचे अधिकारी लक्ष देत नाही. सार्वजनिक नळास पाइप लावल्यानंतर परिसरातील नागरिकांना पाणी मिळत नाही, अशी तक्रार आहे.
नळ बंद करण्यासाठी प्रस्ताव
महापालिकेच्या सार्वजनिक नळावरून व्यवसायासाठी पाणी घेता येत नाही. ही बाब आमच्या लक्षात आल्याने तो नळ बंद करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयाकडे कळविण्यात आला आहे. तेथून मंजुरी आल्यानंतर नळ बंद करण्यात येईल. गैरमार्गाने पाणी घेतल्याबद्दल योग्य ती कारवाई केली जाईल.’’ प्रकाश दिवाणजी, मनपा झोन अधिकारी, क्रमांक 3.
पाणी पिण्यासाठी घेतले
दुकानाशेजारी महानगरपालिकाचा सार्वजनिक नळ आहे. तेथील पाणी आम्ही दुकानात पिण्यासाठी वापरतो. व्यवसायासाठी नाही.’’ भारत महिंद्रकर, दुकानदार