आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चौपदरीकरणाने मिळणार शहर विकासाला चालना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर: सोलापूर शहराला जोडणार्‍या सर्व राष्ट्रीय महामार्गांचे चौपदरीकरण होत आहे. यामुळे सोलापूरच्या विकासाला चालना मिळणार आहे. येत्या चार वर्षांत हे चौपदीकरण पूर्ण होणार आहे.
सोलापूर हे एक मोठे खेडे आहे, असे उपहासात्मक म्हटले जाते. परंतु, आता खर्‍या अर्थाने सोलापूरच्या विकासाला सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. सोलापूर- पुणे रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम 50 टक्क्यांहून अधिक झाले आहे. तर सोलापूर-धुळे, सोलापूर-विजापूर आणि सोलापूर-हैदराबाद या रस्त्यांच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. शहराला जोडणार्‍या सर्व महामार्गांचे चौपदरीकरण होणार असल्याने दळणवळणाची अनेक साधने उपलब्ध होणार आहेत. तसेच आर्थिक, औद्यागिक, शैक्षणिक, शेती आदी क्षेत्राची चौफेर प्रगती साध्य होणार आहे.
सोलापूर - पुणे महामार्ग
पुणे ते भीमानगर या 150 किलोमीटरच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सोलापूर ते भीमानगर या 100 किलोमीटरचे काम वेगाने सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातील कामासाठी 835 कोटी रुपये खर्च येणार आहे. जानेवारी 2014 पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. या मार्गावर 19 ठिकाणी रस्ता क्रॉसिंग आहे. तसेच मोहोळ येथे उड्डाणपूल आणि मोडनिंब येथे रेल्वे उड्डाणपूल होणार आहे. भुयारी पादचारी मार्ग आणि भुयारी वाहनांसाठी मार्गही करण्यात येणार आहेत. लांबोटी आणि अरण या दोन ठिकाणी टोल नाके होणार आहेत. या टोल नाक्यांवरच महामार्ग सुरक्षा केंद्र उभारण्यात येणार आहे. यामध्ये अँम्बुलन्स, टेहाळणी वाहन आणि अपघात घडल्यास किंवा एखादे वाहन बंद पडल्यास क्रेनची व्यवस्था चोवीस तास राहणार आहे. सध्या सोलापूरहून पुण्यास जाण्यासाठी 6 ते 7 तास लागतात. तो वेळ कमी होऊन चार तासांवर येणार आहे.
सोलापूर-हैदराबाद महामार्ग
या कामाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सोलापूर ते संगारेड्डी हा 245 किलोमीटरचा महामार्ग चौपदरी करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या हद्दीतील 100 किलोमीटरच्या कामासाठी 923 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मुख्य काम डिसेंबर 2012 मध्ये सुरू होणार आहे.
सोलापूर - विजापूर
चौपदरीकरणासाठी टेंडर काढण्यात आले आहे. 110 किलोमीटरच्या कामासाठी 1097 कोटी रुपये लागणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील भूसंपादनासाठी नुकतीच जनसुनावणी घेण्यात आली आहे. हत्तूर ते टाकळी दरम्यानचे भूसंपादन प्रगतिपथावर आहे. पुण्याहून येणार्‍या वाहनांना थेट विजापूर रोडवर जाण्यासाठी बायपास करण्यात येणार आहे. विजापूरला जाणारी वाहने बायपास रस्त्यावरून जातील.
सोलापूर-धुळे महामार्ग
सोलापूर - धुळे महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम शासनाच्या 2012-13 या आर्थिक वर्षाच्या आराखड्यात समाविष्ट करण्यात आले आहे. मराठवाडा आणि विदर्भाकडे दळणवळणासाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे. या महामार्गाच्या भूसंपादनासाठी काही दिवसांपूर्वी जनसुनावणी घेण्यात आली आहे.
झाडे लावणे बंधनकारक
महामार्गाचे चौपदरीकरण करताना तीन पट झाडे लावण्याचे बंधन आहे. सोलापूर-पुणे महामार्गावर चौपदरीकरण करताना चांगल्या अवस्थेतील 100 झाडांचे रिप्लांटेशन करण्यात आले आहे. त्याचबरोबर पर्यावरणदिनी प्राधिकरणाने पुणे रस्त्यावर झाडे लावण्यास प्रारंभ केला आहे.